दिव्यांग श्रुती पंडीतचे बारावी परिक्षेत यश

रमेश मोरे 
बुधवार, 30 मे 2018

शितोळेनगर येथील श्रुती श्रीकांत पंडीत ही विशेष विद्यार्थीनी प्रौढ लेखनिकेसह बारावीच्या परिक्षेस बसली होती. श्रुती ही विशेष विद्यार्थीनी असल्याने ती इतर सर्वसामान्य मुलामुलींप्रमाणे लिहु व बोलु शकत नाही. तसेच तिला लगेच समजेल असेही नाही. याच गोष्टींमुळे आठवीनंतर तिचे शाळेत जाणे थांबले.

जुनी सांगवी(पुणे) - शितोळेनगर येथील श्रुती श्रीकांत पंडीत ही विशेष विद्यार्थीनी प्रौढ लेखनिकेसह बारावीच्या परिक्षेस बसली होती. श्रुती ही विशेष विद्यार्थीनी असल्याने ती इतर सर्वसामान्य मुलामुलींप्रमाणे लिहु व बोलु शकत नाही. तसेच तिला लगेच समजेल असेही नाही. याच गोष्टींमुळे आठवीनंतर तिचे शाळेत जाणे थांबले.

वडील श्रीकांत पंडीत व आई सौ. माधवी पंडीत यांनी आपल्या मुलीने शिकावे, तिला ईतरांप्रमाणे स्वताच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी मनाशी खुणगाठ बांधली. त्यांनी मार्च २०१६ मध्ये दहावी परिक्षेचा सतरा नंबर अर्ज भरून श्रुतीला दहावीला बसवले. दहावी परिक्षेत श्रुतीला ५० टक्के गुण मिळाले. दहावी उत्तीर्ण झाल्यावर आता तिने १२ वीच्या परिक्षेत ५४ टक्के गुण मिळवुन यश संपादन केले आहे. 

शासन निर्णयानुसार अशा विशेष विद्यार्थ्यांना दहावी व बारावी परिक्षेसाठी लेखनिक घेण्याची मुभा असली तरी आतापर्यंत लेखनिक परिक्षार्थी विद्यार्थ्यांपेक्षा लेखनिक वयाने लहान राहिला आहे. मात्र विशेष विद्यार्थ्यांना १५ फेब्रुवारी २०१६ रोजी शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांपेक्षा प्रौढ लेखनिक घेवुन परिक्षा देण्याची मुभा मिळाली. आणि श्रुती लेखनिकेसह बारावी पास झाली.
 श्रुती ही  एकुलती एक मुलगी आहे. आई खाजगी नोकरी करते. तर वडील हे घर व्यवसाय सांभाळुन श्रुतीची पुर्णवेळ काळजी घेतात. 

श्रुतीला स्मार्ट फोन हाताळता येतो. तिला चित्रकलेचाही छंद आहे. श्रुती जन्मतच ५० टक्के सौम्य (मतिमंद) दिव्यांग आहे. श्रुतीला बारावी पर्यंत शिकविले तरी पुढे काय? असा प्रश्न पंडीत दांपत्याला पडला आहे. कारण महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिला लेखनिकाची सुविधा मिळणार नाही. श्रुतीचीही शिकण्याची ईच्छा आहे. 

पदवी पर्यंत अशा विद्यार्थ्यांना लेखनिकेसह परिक्षेची सवलत असायला हवी. श्रुती नक्कीच पुढचे शिक्षण पुर्ण करेल
. असे तिच्या आईने यावेळी मत व्यक्त केले. तर, माझा हा लेखनिक म्हणुन परिक्षा देण्याचा पहिलाच अनुभव आहे. श्रुतीला समजण्यासाठी मला आधी तिच्याशी मैत्री करावी लागली. अशी मुले खुप हळवी असतात. मात्र त्यांच्याशी मिळुन मिसळुन आईच्या ममतेप्रमाणे माया करावी लागते. ती काय बोलते, कशी उत्तरे देते हे समजुन घेवुन तिच्याशी मैत्री करावी लागते असे श्रुतीच्या 
लेखनिक राहिलेल्या प्रियंका हांडे यांनी सांगितले आहे.

Web Title: handicapped shruti sucees in 12 th exam