Hapus Mango : पुणेकरांनी चाखला १९ कोटींचा हापूस!

यंदा हवामान बदलांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर घटले होते.
hapus-mango
hapus-mangosakal

पुणे - यंदा हवामान बदलांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर घटले होते. परिणामी बाजारपेठेत ऐन सणासुदींच्या काळात हापूस आंब्याची टंचाई निर्माण झाली होती. मात्र या टंचाईतही महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या पुण्यातील आंबा महोत्सवातून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.

शेतकरी ते ग्राहक या उपक्रमाअंतर्गत झालेल्या महोत्सवातून पुणेकरांनी सुमारे १९ कोटी रुपयांचा आंबा चाखला आहे. तर आंबा निर्यातीमध्येही यंदा वाढ झाली असून पणन मंडळाच्या वाशी निर्यात सुविधा केंद्रावरून यंदा ९४२ टन निर्यात झाली आहे.

यंदाच्या आंबा महोत्सव एक एप्रिल ते तीन जून २०२३ दरम्यान मार्केट यार्डमधील जिल्हा परिषदेच्या जागेवर झाला. यामध्ये ६७ स्टॉल्स होते. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांसह कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक असे १०५ शेतकरी सहभागी झाले होते.

टिकलेल्या मोहराच्या पहिल्या टप्प्यात बाजारात आंब्याची आवक नियमित सुरू झाली. मार्च महिन्यात ती अपेक्षेएवढी होती. फेब्रुवारीत दिवसा तापमान अधिक असायचे. रात्री तापमानात घट व्हायची. त्यामुळे दुसऱ्या बहरात झाडांना पालवी जास्त येऊन मोहोर कमी आला. अलीकडील दिवसांतही ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व गारपीट हे प्रकार घडले.

आवक अन् दर

यंदाच्या आंबा महोत्सवावर हवामान बदलाचे सावट असल्याने एप्रिल महिन्यात महोत्सवाच्या प्रारंभाला आवक कमी राहिल्याने दर ७०० ते १ हजार २०० रुपये राहिल्याचे पणन मंडळाचे सहाय्यक सरव्यवस्थापक आणि महोत्सवाचे नियंत्रक मंगेश कदम यांनी सांगितले. एप्रिलचा पूर्ण महिना हे दर कायम होते. यानंतर मे महिन्यामध्ये आवक सुरळीत होऊन, दर ५०० ते ७०० रुपये प्रति डझन राहिले.

यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातून आवकेला सुरुवात झाल्यानंतर आंबा थोडा आवाक्यात आला. यावेळी दर ३०० ते ५०० रुपये डझन राहिला. महोत्सवामध्ये साधारण अडीच ते तीन लाख डझन आंबा विक्री झाली. यावेळी महोत्सवामध्ये सरासरी ७०० रुपये प्रति डझन विक्रीतून साधारण १९ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे कदम यांनी सांगितले.

या वर्षी तापमानातील चढ-उतार, धुके, अवकाळी पाऊस आदी विविध कारणांनी उत्पादनात सुमारे ५० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट झाली आहे. फेब्रुवारीमधील आगापचा हंगाम चांगला मिळाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या हंगामात मोहरच न आल्याने ५० टक्केच उत्पादन मिळाले.

- दर्शन नार्वेकर, रा. वाडा, ता. देवगड, सिंधुदुर्ग

यंदाच्या आंबा हंगामात टंचाईमध्ये देखील आंबा निर्यात चांगली झाली. एप्रिलमध्ये निर्यातीसाठी आंब्याची टंचाई होती. मात्र मेमध्ये चांगला आंबा उपलब्ध झाला. यावर्षी आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, लंडन, जपान आणि नेदरलॅंड येथे ६५० टन आंबा निर्यात केली. गेल्यावर्षीच्या तुलनेत १०० टनांनी जास्त आंबा आम्ही निर्यात केला. यामध्ये अमेरिकेचा वाटा जास्त होता.

- अभिजित भसाळे, रेनबो इंटरनॅशनल एक्स्पोर्टस्

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com