Har-Har Mahadev : हर हर महादेव' चित्रपटाच्या दिग्दर्शक, निर्मात्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने कायदेशीर नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

movie

Har-Har Mahadev : हर हर महादेव' चित्रपटाच्या दिग्दर्शक, निर्मात्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने कायदेशीर नोटीस

पुणे : 'हर हर महादेव' या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण होत आहे. शिवाजी महाराजांसोबत लढणारे बांदल सरदारांचे वंशज, पासलकरांचे वंशज आणि संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आली.

या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या प्रसंगाचा ७ दिवसांच्या आत पुराव्यासह लेखी खुलासा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाजी महाराज महाराष्ट्राची प्रेरणा आणि अस्मिता आहेत. चित्रपटविषयक स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाचे अशा प्रकारचे विकृतीकरण कसल्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. योग्य व समाधानकारक खुलासा न आल्यास या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार आहोत, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी सांगितले.

या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय मराठा सेवा संघ यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चित्रपटगृह बंद पाडून निषेध व्यक्त केला होता.