
पुणे महापालिकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असले पाहिजे. मात्र, पुरुष सहकाऱ्यांकडून किंवा वरिष्ठांकडून होणाऱ्या जाचाला सामोरे जावे लागतेय.
Pune Municipal : महापालिकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून त्रास
पुणे - पुणे महापालिकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असले पाहिजे. मात्र, पुरुष सहकाऱ्यांकडून किंवा वरिष्ठांकडून होणाऱ्या जाचाला सामोरे जावे लागतेय. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या महिलांना विशाखा समितीच्या कडक भूमिकेमुळे ‘आधार’ मिळत आहे. त्यामुळे महिला पुढे येण्याची हिंमत करत आहेतच, शिवाय दोषींचा समाचार घेऊन त्यांना धडा शिकवला जात आहे.
समिती कशासाठी?
शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये महिलांना काम करताना होणाऱ्या लैंगिक त्रासासह टोमणे मारणे व मानसिक त्रास देण्याचे प्रकार घडतात. हे प्रकार कमी व्हावेत, महिलांना काम करताना निर्भय आणि पोषक वातावरण असावे, यासाठी विशाखा समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य महापालिका भवनात महिलांसाठी एक, आरोग्य विभागाची एक आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी विशाखा समिती स्थापन केल्या आहेत. या समितीच्या अध्यक्षपदी महिला अधिकारी असून, विधी, सामान्य प्रशासन यासह इतर विभागातील वरिष्ठ अधिकारी सदस्य असतात.
कार्यशाळेनंतर तक्रारी
महापालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षीत वातावरण असावे, त्रास होत असेल तर त्यांनी तक्रार करावी यासाठी गेल्यावर्षी विधी विभागातर्फे महिलांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यांना त्यामध्ये विशाखा समिती, महिलांसाठीचे कायदे याची माहिती देऊन जनजागृती केली. त्यानंतर तक्रारींचे प्रमाण वाढले असल्याचे प्रशासनातर्फे सांगितले.
१३ तक्रारींवर सुनावणी सुरू
पुणे महापालिकेत २००६ पासून विशाखा समितीच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यानुसार कारवाई केली जात आहे. २००६ ते २०२२ पर्यंत एकूण ६३ तक्रारी आलेल्या आहेत. त्यापैकी १८ तक्रारी या तडजोडीने बंद केल्या आहेत. तीन तक्रारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे वर्ग केल्या आहेत. २७ प्रकरणांमध्ये पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिक्षा दिली आहे. १३ तक्रारींवर सध्या सुनावणी सुरू असून, दोन तक्रारींची सुनावणी सुरू झालेली नाही.
कोरोनानंतर त्रास वाढला
महापालिकेत १६ वर्षांत ६३ तक्रारी आलेल्या असल्या, तरी त्यातील १६ तक्रारी या २०२१ आणि २०२२ या वर्षांतील आहेत. कोरोनानंतर महापालिकेचे कामकाज १०० टक्के क्षमतेने सुरू झाल्यानंतर महिलांना त्रास देण्याचे प्रकार वाढले असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास आलेले आहे. यामध्ये २०२१-२२ मध्ये नऊ आणि २०२२-२३ मध्ये सात तक्रारी आलेल्या आहेत. या १६ पैकी सध्या १३ प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
अशाप्रकारे त्रास
कामाच्या ठिकाणी जास्तवेळ थांबवून ठेवणे
कामानिमित्त वारंवार बोलावून घेणे
शेरे किंवा टोमणे मारून विचित्र वागणूक देणे
मेसेज किंवा कॉलद्वारे दडपण टाकणे
अशोभनीय वर्तन करणे
अशी होते दोषींना शिक्षा
गंभीर तक्रार असेल व पोलिसांकडे तक्रार केल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो
विशाखा समितीमध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातात
महिलेला त्रास दिला जात असल्यास, तक्रारीच्या गांभीर्यावरून कारवाई केली जाते
संबंधित कर्मचाऱ्याची बदली करणे, सक्त ताकीद देणे, पगारवाढ थांबविणे, सेवा पुस्तकात नोंद करणे
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये असलेल्या विशाखा समितीमध्ये व्यवस्थित काम होत नसल्याने महापालिका भवनातील समितीकडे तक्रारी येत आहेत. त्यांची आम्ही गांभीर्याने दखल घेऊन महिलेला न्याय देतो व संबंधितावर कारवाई करतो. महिलांनी तक्रारी देण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे, त्यासाठी आमचे प्रयत्नही सुरू आहेत.
- उल्का कळसकर, अध्यक्ष, विशाखा समिती, तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी