हवेली पोलिसांचं 'वरातीमागून घोडं'; अखेर पोलीस अधीक्षकांनी घातलं लक्ष | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किरकटवाडी फाट्यावरील वाहतूक कोंडी

हवेली पोलिसांचं 'वरातीमागून घोडं'; अखेर पोलीस अधीक्षकांनी घातलं लक्ष

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्यावर मागील चार दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ मोठी वाहतूक कोंडी होत असून आजही परिस्थिती 'जैसे थे' पाहायला मिळाली. सकाळी 8 ते 10 या वेळेत वाहतूक कोंडी होत असताना बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी साडेदहा ते अकरा वाजल्यानंतर किरकटवाडी फाट्यावर येत असल्याने ' वरातीमागून घोडे' या म्हणीचा प्रत्यय वाहतूक कोंडीत अडकवून बेजार झालेल्या नागरिकांना येत आहे. अखेर या वाहतूक कोंडीबाबत तोडगा काढण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी लक्ष घातले असून वाहतूक नियोजनासाठी आजच आदेश पारित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा: हडपसर भाजपची महिला कार्यकारिणी जाहीर

किरकटवाडी फाट्याजवळ सिंहगड रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच बाजूने वळवण्यात आल्याने सकाळ व संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे. किरकटवाडी, नांदोशी-सणसनगरच्या बाजूने येणारी वाहने, खडकवासला, पानशेतच्या बाजूने येणारी वाहने व पुण्याकडून येणारी वाहने किरकटवाडी फाट्याजवळ एकत्र येत असल्याने अगोदरच अरुंद असलेला रस्ता काम सुरू असल्याने अपुरा पडत आहे. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून स्थानिक नागरिक व नोकरदारांचे हाल होत आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा हवेली पोलीस ठाण्याकडून कोणतेही नियोजन करण्यात आलेले दिसत नाही.

उशिरा दाखल झालेले हवेली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी

उशिरा दाखल झालेले हवेली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी

"मी एक तास किरकटवाडी फाट्याजवळ वाहतूक कोंडीत अडकले होते. एकच होमगार्ड जवान वाहतूक कोंडीच्या ठिकाणी दिसत होता, त्याचेही कोणी ऐकत नव्हते. सकाळ- संध्याकाळ पोलीसांनी थोडे लक्ष देणे आवश्यक आहे." सरकारी महिला कर्मचारी.

"सकाळी कामावर जाताना वेळेत पोहचणे महत्वाचे असते.प्रत्येकाला घाई असते.त्यामुळे वाहतूक नियंत्रण सकाळपासून झाल्यास कोंडी होणार नाही. मुख्य चौकात काम करताना काय काळजी घ्यावी हे सामान्य माणसाने सांगावं लागण ही शोकांतिका आहे." पंकज ठोमरे, नोकरदार, किरकटवाडी.

"हवेली उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना किरकटवाडी फाट्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाबाबत पाहणी करुन तातडीने नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच पुणे शहर वाहतूक पोलीस विभागाचीही मदत घेण्यात येणार आहे. सकाळ-संध्याकाळ बंदोबस्त तैनात ठेवण्याचे हवेली पोलीस ठाण्याला सूचीत करण्यात आले आहे. पर्यायी वाहतूक मार्गाबाबत व वाहतूक नियोजनाबाबत आजच आदेश पारित करून घेण्यात येणार आहेत." डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.

loading image
go to top