हवेली तालुक्यात 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ, 'या' भागात आढळले रुग्ण

जनार्दन दांडगे
बुधवार, 8 जुलै 2020

हवेली तालुक्यात iगेल्या  24 तासात नव्वदहुन अधिक रुग्णांची वाढ, बुधवारी दिवसभरातील एकुण रुग्णांपैकी 80 टक्क्यांहून अधिक रुग्ण पुर्व हवेलीमधील.

लोणी काळभोर - हवेली तालुक्यामधील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येने बुधवारी (ता. ८) दिवसभरात उच्चांक गाठला असुन, संपुर्ण तालुक्यात बुधवारी दिवसभरात नव्वदहुन अधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे हवेली तालुक्यातील अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा 390 इतका झाला आहे. विशेष बाब म्हणजे संपुर्ण हवेली तालुक्यात बुधवारी दिवसभरात आढळुन आलेल्या एकुन रुग्णांपैकी तब्बल सत्तर टक्कयाहुन अधिक रुग्ण पुर्व हवेलीमधील मांजरी बुद्रुक, लोणी काळभोर, उरुळी कांचन, शेवाळेवाडी, वाघोली या प्रमुख ग्रामपंचायत हददीमधील आहेत. यामुळे पुर्व हवेली कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्याचे दिसुन येत आहे. 

हे वाचा - चिंतेत पडलेल्या अश्विनी कदमांनी केला अजितदादांना फोन

दरम्यान, हवेली तालुक्यात गेल्या अडीच महिन्याच्या कालावधीत आढळुन आलेल्या रुग्णांच्या संख्येचा विचार करता, बुधवारी आढळुन आलेल्या रुग्णांची संख्या उच्चांकी असल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली आहे. उरुळी कांचन (१४), वाघोली (तेरा), मांजरी बुद्रुक (१३), शेवाळवाडी (५), लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (सहा), खडकवासला (अकरा) व फुरसुंगी (दहा) या प्रमुख ग्रामपंचायत हददीत रुग्ण सापडले आहेत. यामुळे वरील सर्व ग्रामपंचायत हद्दीत बुधवार (ता. ८) पासुन पुढील आनिश्चित काळासाठी कंटेन्मेट झोन जाहीर करण्यात आला असुन,  अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारचे व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती डॉ. सचिन खरात यांनी दिली आहे. 

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

याबाबत अधिक माहिती देतांना डॉ. सचिन खरात म्हणाले, तालुक्यात गेल्या दोन दिवसात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र बुधवारी दिवसभरात रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी दिवसभरात नव्वदहुन अधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर चार जणांची प्रकृती चिंताजणक आहे. रुग्ण दुप्पटीचा वेग अकरा दिवसांवरुन दहा दिवसावर आला आहे. तालुक्यातील रुग्णांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी  प्रशासनाने कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची सखोल चौकशी सुरु केली आहे. तर रुग्णांच्या स्वॅब (घशातील द्रव) ची तपासणी संख्या वाढवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: haveli tahsil record break corona patient in last 24 hours