हवेलीचे विभाजन कधी? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

 हवेली तालुक्‍याचे विभाजन करण्यासंदर्भातील प्रस्ताव तीन वेळा जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

पुणे - हवेली तालुक्‍याचे विभाजन करण्यासंदर्भातील प्रस्ताव तीन वेळा जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. येत्या अधिवेशनात तरी या प्रस्तावाला मंजुरी मिळणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे. सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली, तर पूर्व हवेलीमध्ये वाघोली, उरुळी कांचन, थेऊर आणि हडपसर या मंडलांमधील, तर पश्‍चिम हवेली तालुक्‍यात खेड शिवापूर, खडकवासला, कोथरूड आणि कळस या चार मंडलांमधील गावांचा समावेश होऊ शकतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात हवेली तालुक्‍याचा विस्तार आहे. सातबारे उतारे, एनए परवानगी, नुकसानीचे पंचनामे, निवडणुका या सर्वांची जबाबदारी महसूल खात्याकडे असते. त्याचबरोबर विविध मंत्र्यांचे दौरे सांभाळण्याची जबाबदारी तहसीलदारांकडे असते. उच्च न्यायालयात दाव्यांसाठी तहसीलदारांना हजर राहावे लागते.

या पार्श्‍वभूमीवर २०१५ मध्ये तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी हवेली तालुका विभाजनाचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने पूर्व हवेली आणि पश्‍चिम हवेली, असे दोन तालुके करण्याचा प्रस्ताव दिला होता. तत्कालीन विभागीय आयुक्तांनीदेखील प्रस्ताव पाठविला होता. पुन्हा एकदा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हवेली तालुक्‍याच्या विभाजनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. पुढील आठवड्यात अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हवेली तालुक्‍याचे विभाजन करावे, अशी मागणी आमदारांचीदेखील आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव मंजूर होणार का, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

२८ लाख - हवेलीची लोकसंख्या
१३४ -  तालुक्‍यातील गावे
८ - एकूण मंडल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: haveli taluka division issue