
Army Day : दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख यांचा बंगळूर दौरा; लष्कर दिनाच्या तयारीचा आढावा
पुणे : भारतीय लष्कर दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए.के.सिंह यांनी मंगळवारी (ता. २७) बंगळूर येथील मद्रास इंजिनिअर ग्रुप आणि सेंटरला भेट दिली. तसेच त्यांनी समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.
भेटी दरम्यान लेफ्टनंट जनरल सिंह यांनी मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती निवारणाच्या तयारीचा ही आढावा घेण्यासाठी चेन्नई येथील दक्षिण भारत (डीबी) क्षेत्र मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व अधिकारी व जवानांना या मानवतावादी कार्यात उत्कृष्ट कामगिरी करत राहण्याचे आवाहन केले. याबाबतची माहिती दक्षिण मुख्यालयाने ट्वीटद्वारे दिली आहे.
१५ जानेवारी १९४९ या दिवशी शेवटचे ब्रिटिश सेनापती जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून तत्कालीन जनरल करिअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेव्हापासून दरवर्षी १५ जानेवारीला ‘लष्कर दिन’ म्हणून साजरा केला जातो.
केंद्राच्या निर्णयानुसार आता लष्कर दिनाचा संचलन सोहळा दिल्लीच्या बाहेर करण्यात येत आहे. त्यानुसार आता २०२३ मधील लष्कर दिन संचलन सोहळा दक्षिण मुख्यालया अंतर्गत येणाऱ्या बंगळूर येथे आयोजित करण्यात आला आहे.