यंदा आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड होणार; आरोग्यमंत्र्यांनी दिलं गिफ्ट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी जुलै महिन्यात गट प्रवर्तकांना तीन हजार रुपये आणि आशा स्वयंसेविकांना दोन हजार रुपये देण्याचे मान्य केले होते.

पुणे : राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तंकांना अखेर दिवाळीपूर्वी वाढीव मोबदला देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविकांना प्रतिमाह दोन हजार रुपये आणि साडेतीन हजार गटप्रवर्तकांना तीन हजार रुपये याप्रमाणे जुलै ते ऑक्‍टोबर या कालावधीतील मोबदला मिळणार आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तंकांची दिवाळी गोड होणार आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात 70 हजार आशा स्वयंसेविका आणि साडेतीन हजार गटप्रवर्तकांना याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी 57 कोटी 56 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ही रक्‍कम वितरीत करण्यात येणार आहे. या संदर्भात आरोग्य विभागाने निर्णय जारी केला आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्‌विट करून सांगितले. 

शिक्षकांचं ट्रेनिंग सुरू; 'नीट'चा निकाल वाढविण्यासाठी 'डीपर'ने घेतला पुढाकार​

महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी जुलै महिन्यात गट प्रवर्तकांना तीन हजार रुपये आणि आशा स्वयंसेविकांना दोन हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. परंतु ही रक्‍कम देण्यास विलंब होत असल्यामुळे कृती समितीने आंदोलने केली. त्यावर आरोग्य मंत्री टोपे यांनी दिवाळीपूर्वी ही रक्‍कम देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ही रक्‍कम आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांना दिवाळीला मिळेल का, याबाबत साशंकता होती. त्यामुळे कृती समितीच्या वतीने 5 नोव्हेंबर रोजी राज्यातील सत्ताधारी मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता.

अपयश लपविण्यासाठी राज्य सरकार दडपशाही करतंय; भाजप नेत्याची टीका​

राज्य सरकारने त्याची दखल घेत अखेर वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत लेखी आदेश काढले आहेत. त्यामुळे कृती समितीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health department finally decided to give increased remuneration to Asha workers in state before Diwali