Thalassemia disease : थॅलेसेमियाची ‘रुधिर-द लाईफ लाइन’

थॅलेसेमिया रुग्णांना मोफत उपचार करण्याचा हा प्रकल्प पुण्यात अकरा महिन्यांपासून अविरत सुरू
health news doctor project of free treatment of thalassemia patients in Pune
health news doctor project of free treatment of thalassemia patients in Punesakal

पुणे : “लहानपणी दर 20-25 दिवसांनी रक्त घेण्याची कटकट वाटायची. जसं-जसा मोठा होत गेलो तसे कळले की, हे रक्त म्हणजे आपली लाइफ लाइन’ आहे. ते मिळते म्हणून आपले हृदय धडधडते. ही धडधड सुरू ठेवण्याचं महत्त्वाकांक्षी कार्य एक पैसाही न घेता पुण्यात ‘रुधिर-द लाइफ लाइन’च्या माध्यमातून सुरू असल्याचे दिसते,” असे विशी-बाविशीतील अमेय बोलत होता... थॅलेसेमिया रुग्णांना मोफत उपचार करण्याचा हा प्रकल्प पुण्यात अकरा महिन्यांपासून अविरत सुरू आहे. अविनाश कॅन्सर क्लिनिक, संजीवन रुग्णालय आणि जनकल्याण रक्तपेढी या संस्थांनी एकत्र येऊन थॅलेसेमिया रुग्णांना मोफत उपचार देता येऊ शकतात, हे अधोरेखित केले आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या या प्रकल्पाची माहिती ‘सकाळ’ने दिली.

संजीवन रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. मुकुंद पेनुरकर म्हणाले, “शरीरात रक्त निर्माण होण्याची प्रक्रिया थॅलेसेमियाच्या रुग्णांमध्ये होत नाही. त्यामुळे त्यांना ठराविक दिवसांनी रक्त संक्रमण करावे लागते. रक्तपेढ्यांमधून या रुग्णांना रक्त मोफत मिळत असले तरीही संक्रमणासाठी दर महिन्याला खर्च असतो. या प्रकल्पात सहभागी होऊन रुग्णाला पैसे भरावे लागणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आली.” अविनाश कॅन्सर क्लिनिकचे डॉ. अनंतभूषण रानडे म्हणाले, “थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त संक्रमण उपलब्ध करून देणे इतका मर्यादीत दृष्टिकोन या प्रकल्पाचा नाही. थॅलेसेमियाच्या लहान रुग्णांचे लवकरात लवकर बोन मॅरो ट्रान्सप्लँट करून त्यांना या रक्त संक्रमणाच्या चक्रातून बाहेर काढणे, या अंतिम उद्देश आहे. अर्थात, हे उपचार खर्चिक आहेत. एका रुग्णाच्या बोन मॅरो ट्रान्सप्लँटसाठी दहा ते पंधरा लाख रुपये खर्च येतो. पण, या खर्चापेक्षा एका थॅलेसेमिया रुग्णाचा समाजावरील भार कमी होतो. या खर्चातून मिळणारा मोठा परतावा आहे, या दृष्टीने बघण्याची गरज आहे.”

लहान वयात उपचार आवश्यक
वयाच्या तीन-चार महिन्यांपासून रुग्णांना थॅलेसेमिया असल्याचे निदान होते. त्यानंतर प्रत्येक ठरावीक दिवसांनी रक्त संक्रमण घ्यावे लागते. त्यातून रुग्णाला सोडविण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लँट हा एकमेव प्रभावी उपाय आहे. तो जितक्या लहानपणी करता येईल, तितका तो प्रभावी ठरतो, असे डॉ. श्वेता लुंकड स्पष्ट केले.

थॅलेसेमिया काय आहे?
- थॅलेसेमिया रक्ताचा आजार आहे. यात लहान मुलांच्या शरीरातील लाल रक्त पेशी नव्याने तयार होत नाहीत. त्या रक्त पेशी अल्पायुषी असतात.
- हा आनुवंशिक विकार असल्याने विवाहापूर्वी रक्तचाचणी करून घ्यावी.
- आई-वडील हे दोघांनाही थॅलेसेमिया मायनरचे वाहक असल्यास होणाऱ्या अपत्यांना थॅलेसेमिया मेजर होण्याचा धोका असतो.

प्रकल्पात सहभागी रुग्ण
वयोगट ............ रुग्णसंख्या
एक वर्षांपेक्षा कमी ...... 6
1 ते 5 वर्षे ............... 8
5 ते 19 वर्षे .............. 9
10 ते 20 वर्षे ............ 13
20 ते 30 वर्षे ............ 8
30 ते 40 वर्षे ............. 6

“महर्षी धोंडे केशव कर्वे यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्वाचा वारसा पुण्याला मिळाला आहे. त्यामुळे अत्यल्प निधी असताना सुरू केलेल्या थॅलेसेमिया वॉरिअर्स चळवळीला लोकसहभाग मिळेल. त्यातून थॅलेसेमियाच्या रुग्णांवर मोफत दर्जेदार उपचार करता येईल,”
- डॉ. अनंतभूषण रानडे, अविनाश कॅन्सर क्लिनिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com