
विश्रांतवाडी : येरवड्यातील पंचशीलनगर येथील बौद्ध विहार परिसरातील जुनी सांडपाणी वाहिनी बदलून नवीन टाकण्याचे काम सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हे काम करताना पिण्याच्या पाण्याची जुनी लोखंडी वाहिनी (सध्या गंजलेल्या अवस्थेत आहे)च्या वर या सांडपाणी वाहिनीचे चेंबर बांधण्यात येत आहे. यामुळे भविष्यात जलवाहिनी फुटल्यास किंवा गंजून गळती लागल्यास मैलापाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता आहे. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात अनेक भागांमध्ये घरांत गढूळ पाणी येण्याचे प्रमाण वाढले असतानाही प्रशासनाकडून पिण्याच्या जलवाहिनीवर सांडपाणी वाहिनीचे चेंबर कसे काय बसवले जात आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.