esakal | पुणे महानगरपालिका समावेशाबाबतच्या १०२ हरकतींची सुनावणी पूर्ण

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation
पुणे महानगरपालिका समावेशाबाबतच्या १०२ हरकतींची सुनावणी पूर्ण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातून पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होत असलेल्या शहरालगतच्या २३ गावांमधून या समावेशाबाबत दाखल करण्यात आलेल्या ४९१ पैकी सोमवारी (ता. १९) १०२ हरकतींवर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ऑनलाईन सुनावणी घेतली. उद्या (ता.२०) हवेली तालुक्यातील पिसोळी गावातील हरकतींवर सुनावणी होणार आहे. एकट्या पिसोळी गावातून तब्बल ३८९ हरकती दाखल झालेल्या आहेत. दरम्यान, आज सुनावणी पूर्ण झालेल्या हरकतींबाबतचा निर्णय येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ही सुनावणी ऑनलाइन घेण्यात आली. यानुसार संबंधित गावच्या ग्रामपंचायत कार्यालयांमधूनच विभागीय आयुक्त राव यांनी हरकतदारांची बाजू ऐकून घेतली. आज सूस, कोपरे, नऱ्हे, वडाची वाडी, नांदोशी, किरकटवाडी, होळकरवाडी, मांजरी बुद्रूक, कोळेवाडी, वाघोली, नांदेड आदी प्रमुख गावांमधील हरकतींची सुनावणी पूर्ण झाली आहे. पिसोळी गावातून सर्वाधिक हरकती दाखल झाल्याने, या गावाची सुनावणी स्वतंत्रपणे ठेवण्यात आली आहे. यानुसार ही सुनावणी उद्या (मंगळवारी) घेण्यात येणार आहे.

यासाठी सूस, कोपरे, नऱ्हे, वडाची वाडी, नांदोशी आणि किरकटवाडी येथून प्रत्येकी एक, होळकरवाडीतून दोन, मांजरी बुद्रूक, कोळेवाडी आणि वाघोलीतून प्रत्येकी पाच आणि नांदेड ग्रामपंचायतींच्या हद्दीतून ६८ हरकती दाखल झाल्या होत्या, असे विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.