
पुणे : शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच भागात दाणादाण उडाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. अनेक सोसायट्या, वस्त्यांमध्ये पाणी शिरले, तर चौकाचौकांत तळे निर्माण झाले होते. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात दिवसभरात पाणी तुंबल्याच्या ९० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. खराब रस्त्यांमुळे पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली.