esakal | घाटमाथ्यांवर पावसाचा जोर 
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने बुधवारी दिला.

घाटमाथ्यांवर पावसाचा जोर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने बुधवारी दिला. मुंबईसह कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान खात्याने गुरुवारी (ता. ५) ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून, पुण्यातील घाटमाथ्यांवरही हाच इशारा दिला आहे.

मुंबईसह कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे; तर उर्वरित राज्यातही हलक्‍या ते मध्यम सरी पडत आहेत. रायगड, घाटमाथा आणि गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी काही ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस  पडला. 

रायगडमध्येही सर्वाधिक पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी १५० मिलिमीटरपेक्षा अधिक नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर, संगमेश्‍वर तालुक्‍यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. सावित्री, जगबुडी, बाव नदीसह काजळी, अर्जुना, कोदवली या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 

मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पातळी २२ फूट दहा इंच होती. कोयना धरणातून हजार क्‍युसेक पाणी सोडले जात आहे, त्यामुळे कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ झाली.  

पुण्याच्या घाटमाथ्यांवर संततधार
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार 
हजेरी लावली. सर्व धरणे भरली आहेत. 
पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी सकाळी खडकवासला, मुळशी, पवना, वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुळा, मुठा, पवना, नीरा, भीमा, इंद्रायणी, भामा या नद्यांना पूर आला आहे. उजनी धरणही शंभर टक्के भरले आहे.

का वाढला पावसाचा जोर?
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा, उत्तर महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर असलेला कमी दबाचा पट्टा, पोषक मॉन्सूनचा आस यामुळे शुक्रवारपर्यंत (ता. ६) पावसाचा जोर कायम राहील.

पुण्यातील पावसाचा अंदाज
  गुरुवार (ता. ५) ते शनिवार (ता. ७) ः हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता २५ ते ५० टक्के
  रविवार (ता. ८) ते मंगळवार (ता. १०) ः हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता २५ ते ५० टक्के

असा पडला पुण्यात पाऊस 
  पुण्यात (शिवाजीनगर) येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
  पुण्यात बुधवारी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत २ मिलिमीटर पाऊस झाला.
  लोहगाव येथे दहा मिलिमीटर आणि पाषाण येथे १९.४ मिलिमीटर पाऊस पडला. 
  १ जूनपासून शिवाजीनगर येथे ८०२.४, पाषाण येथे ९४१.९ आणि लोहगावमध्ये ७००.२ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.

loading image
go to top