पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा; आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज | Pune Rain Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain Updates

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन केले आहे.

पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा; आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज

पुणे - शहर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडले जात आहे, तसेच मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना महापालिकेने दक्षतेचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Rain Updates)

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन केले आहे. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त हे त्या पथकाचे प्रमुख असून, त्यामध्ये पथ, पाणी, मलःनिसारण विभागाचे कनिष्ठ व उपअभियंता, आरोग्य निरीक्षक, घरपाडी विभागाचे कर्मचारी, अग्निशामक दलाचा समावेश आहे. महापालिका भवनात नियंत्रण कक्ष असून, तेथून सीसीटीव्हीद्वारे शहरातील प्रमुख चौक, धोकादायक ठिकाणांवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच येथील संपर्क क्रमांकावर नागरिकांची तक्रार आल्यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालयास त्वरित माहिती दिली जाते. खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने चारीही धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने धरणातून नदीत पाणी सोडले जात आहे. बुधवारी (ता. १३) सकाळी विसर्ग कमी करून पाच हजारापर्यंत खाली आणला होता, पण सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दुपारी तीन वाजता १३ हजार १३८ क्सुसेकपर्यंत विसर्ग वाढविला आहे. मुठा नदीत पाणी सोडल्याने भिडे पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.

हवामान विभागाने पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व पथकांना अलर्ट दिला आहे. खडकवासला धरणातून २० हजार क्युसेकच्या पुढे विसर्ग गेल्यानंतर वस्तीमध्ये पाणी घुसण्याचा धोका निर्माण होतो. त्यामध्ये शिवणे, वारजे, सिंहगड रस्ता, पुलाची वाडी, मंगळवार पेठ, औंध, बोपोडी, पाटील इस्टेट यासह इतर भागात पाणी घुसते. त्यामुळे तेथील नागरिकांना इतर भागात स्थलांतर केले जाते. त्याचीही तयारी केली असून, महापालिकेच्या शाळेत नागरिकांच्या निवासी, विद्युत, पाणी, स्वच्छतागृह याची व्यवस्था केली आहे.

खडकवासला धरणातून विसर्ग कमी आहे, त्यामुळे सध्या तरी नदीकाठच्या वस्तीमध्ये पाणी जाण्याचा धोका नाही; पण २० हजारच्या पुढे विसर्ग गेल्यानंतर धोका निर्माण होऊ शकतो. आम्ही पाटबंधारे खात्याच्या संपर्कात असून, नियंत्रण कक्षही २४ तास सुरू आहे. वस्तीमध्ये पाणी गेल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून नागरिकांची जवळच्या महापालिका शाळांमध्ये निवासाची व्यवस्था केली आहे.

- गणेश सोनुने, सहायक आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग

बाधित होणारे क्षेत्र आणि नदीतील विसर्ग

  • १८ हजार क्युसेक - भिडे पूल

  • २८ हजार क्युसेक - खिलारे वस्ती

  • ३० हजार क्युसेक - कामगार पुतळा परिसर

  • ३५ हजार क्युसेक - पुलाची वाडी

  • ४० हजार क्युसेक - तोफखाना परिसर, डेक्कन पीएमपीएल बसथांब्याच्या मागील बाजू

  • ४५ हजार क्युसेक - पूना हॉस्पिटलचा मागचा भाग, नारायण पेठ, अमृतेश्‍वर मंदिर शनिवार पेठ, नेने घाट, शेख सल्ला दर्गा, मनपा वसाहत कसबा पेठ, मंगळवार पेठ, ताडीवाला रस्ता

  • ५० हजार क्युसेक - शिवणेतील नदी लगतचा भाग, हिंगणे, अलंकार पोलिस चौकीजवळचा कर्वेनगर रस्ता

  • ५४ हजार क्युसेक - जयंतराव टिळक पूल पाण्याखाली जातो

  • ५५ हजार क्युसेक - कोंढवे-धावडे, भीमनगर ओढ्यालगतचा भाग, न्यू कोपरे हद्द, उत्तमनगर इंदिरानगर वसाहत, नांदेड नदी लगतचा भाग, वडगाव बुद्रूक सर्वे क्रमांक १४ व १५, हिंगणे खुर्द सर्वे क्रमांक- १८, अंबिल ओढा लगतचा भाग, दत्तवाडी व राजेंद्रनगर

  • ६० हजार क्युसेक - पाटील इस्टेट झोपडपट्टी

Web Title: Heavy Rain Warning In Pune Disaster Management Department Ready

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..