पिंपरी-चिंचवड शहरात पावसाचे थैमान; पवना, मुळा नदीला पूर

संदीप घिसे 
रविवार, 4 ऑगस्ट 2019

शंकरनगर, कासारवाडी येथील भुयारी मार्गात अडकलेल्या मोटारीतील नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितरित्या बाहेर काढले. तसेच चिंचवडगाव येथील दशक्रिया घाटात उभी असलेली मोटार पूर्णपणे पाण्यात बुडाली या मोटारीत कोणी नागरिक तर नाही ना? याची खातरजमा करण्यासाठी आणि अग्निशामक दलाने मोटारीच्या काचा फोडून आत पाहणी केली. मात्र सुदैवाने त्यात कोणीही नागरिक नव्हते.

पिंपरी (पुणे) : गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीला पूर आला आहे. नदीकाठी असलेल्या नागरिकांना पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे.

शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शहरातील वाहणाऱ्या तीनही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच पवना धरण शंभर टक्के भरल्याने त्यातून चौदा हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकिनारच्या भागांमध्ये पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहराच्या जुनी सांगवी भागातील मधुबन कॉलनी क्रमांक एक ते दहा तसेच मुळानगर परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. येथील नागरिकांना जवळच असलेल्या महापालिकेच्या शाळेमध्ये स्थलांतरीत केले जात आहे. पिंपरी येथील नदी किनारी असलेल्या संजय गांधीनगर झोपडपट्टीमध्येही पाणी शिरले आहे.

शंकरनगर, कासारवाडी येथील भुयारी मार्गात अडकलेल्या मोटारीतील नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितरित्या बाहेर काढले. तसेच चिंचवडगाव येथील दशक्रिया घाटात उभी असलेली मोटार पूर्णपणे पाण्यात बुडाली या मोटारीत कोणी नागरिक तर नाही ना? याची खातरजमा करण्यासाठी आणि अग्निशामक दलाने मोटारीच्या काचा फोडून आत पाहणी केली. मात्र सुदैवाने त्यात कोणीही नागरिक नव्हते.

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यामुळे चिंचवडगाव परिसरातील तानाजी नगर, माणिक कॉलनी आदी परिसरांमध्ये पुराचे पाणी येण्याची शक्यता महापालिकेने वर्तवली आहे. तसेच नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainfall in Pimpri chinchwad flood situation on Pawna and Mula River