मुसळधार पावसाने भिगवणकरांना झोडपून काढले

indapur flood.
indapur flood.

भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भिगवण व परिसरातील मदनवाडी, तक्रारवाडी, डिकसळ, पोंधवडी आदी गावांमध्ये रविवारी (ता. ६) रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे काढणीयोग्य खरिपांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच, घरांमध्ये पाणी शिरले. मदनवाडी ओढा मागील अनेक दिवसांत पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिला. येथील महाबॅंक ग्रामीण विकास केंद्रातील पर्जन्य मापकांवर ४८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

भिगवण व परिसरामध्ये चालू हंगामामध्ये पावसाने अक्षरशः कहर केला आहे. जुनपासून अपवाद वगळता दररोज पाऊस पडत होता. मागील आठवडाभर पावसाने विश्रांती दिल्यामुळे शेतकरी वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला होता. शनिवारी व रविवारी दोन दिवस प्रचंड उकाडा होता. रविवारी (ता. ६) रात्री नऊच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसास सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे एक ते दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने भिगवणकरांना अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे भिगवण शहरातील रस्ते जलमय झाले होते, तर शेतामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. 

या पावसामुळे खरिपाच्या उडीद, मका, तुर, बाजरी व भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर नुकत्याच लागवड केलेल्या उसाच्या पिकामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. त्यामुळे त्याचा परिणाम उगवणीवर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसामुळे परिसरातील मदनवाडी व भिगवण येथील ओढ्याला पूरसश्य परिस्थिती निर्माण झाली होती. ओढ्याचे पाणी शेतामध्ये व काही घरामध्येही घुसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

याबाबत येथील तक्रारवाडी येथील शेतकरी विकास वाघ यांनी सांगितले की, चालू वर्षी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ऊस, मका आदी पिके भुईसपाट झाली, तर नवीन लागवड केलेल्या उसाच्या उगवणीवर परिणाम होणार आहे. खरीपाच्या बाजरी, मका, सोयाबीन आदी पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे. महसूल विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com