दक्षिण पुरंदरमध्ये पावसाचा धुमाकूळ; रुद्र, कर्पूर गंगा नदीला पूर 

संतोष जंगम
Monday, 21 September 2020

बाजरी, सोयाबीन, भुईमूगाचे नुकसान

परिंचे (पुणे) : दक्षिण पुरंदरमधील पट्ट्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. बाजरी, सोयाबीन, भुईमूग पिकांच्या बरोबर तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रुद्र गंगा व कर्पूर गंगा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पांगारे, हरगुडे, परिंचे, बहिरवाडी, बांदलवाडी या ठिकाणी सोमवारी दुपारी बारा वाजता मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. दोन तास मुसळधार पाऊस कोसळत होता. ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. पांगारे परिसरातील झेंडूच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी बांध व ताली फुटून शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असल्याचे पोलिस पाटील तानाजी काकडे यांनी सांगितले. 

आरोग्य सुविधांचे ‘ऑपरेशन’ गरजेचे! 

रुद्र गंगा नदी व कर्पूर गंगा नदीला पूर आला आहे. गेल्या पंधरा वर्षांत कधीच नाही एवढे पाणी नदीपात्रातून वाहून गेले असल्याचे दत्तात्रय चंदरराव जाधव यांनी सांगितले. पुरामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले असून पुलांचे व स्मशानभूमींचे नुकसान झाले आहे. पुरामुळे पुलावरील संरक्षण कठडे तुटले असून तातडीने याठिकाणी दुरुस्ती करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश गुरव यांनी केले आहे. 

हतबल प्रशासनापुढे ‘जम्बो’ समस्या!

 

 

बहिरवाडी, काळदरी परिसरात पडत असलेल्या अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भात खाचरे वाहून गेली असून भातावर शेवाळ वाहून आले आहे. अवकाळी पावसाने भात शेतीला मोठा फटका बसला असून भात उत्पादनात घट होणार आहे. 
- दशरथ जानकर, सरपंच, बहिरवाडी, ता. पुरंदर 
 

 

परिंचे परिसरात बाजरीची काढणी सुरू असून सोयाबीन काढणी अवस्थेत आहे. रोज पडत असलेल्या पावसामुळे शेतात काढून पडलेल्या बाजरीला अंकुर फुटण्याची वेळ आली आहे. पावसात भिजलेले धान्य खाण्यायोग्य राहत नाही. 
- सुरेश जाधव, शेतकरी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in South Purandar