
पुणे : वर्षश्राद्धचा अनावश्यक खर्च टाळून अनाथाश्रमाला मदत
खडकवासला - घरातील सदस्यांच्या वाढदिवसाला पार्टी करण्याऐवजी अनाथाश्रम, वृद्धाश्रमात जाऊन अन्नदान, वस्तू देऊन साजरा करण्याचा सामाजिक जाणिवेचा पायंडा त्यांनी केला होता. मागील वर्षी त्यांचेच कोरोनाने निधन झाले. त्यांचे तिथीनुसार वर्षश्राद्ध व जन्मदिवस एकच आल्याने ७५ ओलांडलेली आई व त्यांची पत्नी यांनी पुरोगामी निर्णय घेतला. सध्याच्या प्रचलित पद्धतीने वर्षश्राद्ध न करता अनाथाश्रमाला ५३ हजार रुपयांची मदत करीत तो पायंडा त्यांच्या मुलाच्या माध्यमातून पुढे सुरू ठेवला. राजेंद्र गेनभाऊ पोकळे यांचे मागील वर्षी मे महिन्यात कोरोनाच्या आजाराने निधन झाले. राजेंद्र यांनी त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्यांच्या वाढदिवस मित्र परिवाराला पार्टी न देता अनाथाश्रम, वृद्धाश्रमात जाऊन साजरा केला. राजेंद्र हे धायरीतील शेतकरी कुटुंबातील. शेती, दुभती जनावरे पाळणे त्यांना आवड होती. पोकळे डेअरी नावाने त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. धायरीतील धायरेश्वर पतसंस्थेत व्यवस्थापक होते.
वर्षश्राद्धची सध्याची पध्दत आहे. असे वर्ष श्राद्ध न करता राजेंद्र यांचे ८२ वर्षाचे वडील गेनभाऊ पोकळे यांची ७५ ओलांडलेली आई शारदा, पत्नी सुजाता यांनी सामाजिक भान जपत वर्षश्राद्धचा अनावश्यक खर्च टाळला. त्यातून वाचविलेली रक्कम एखाद्या सामाजिक कार्यासाठी द्यायचे ठरविले. त्यांनी अनिल सोपान पोकळे यांच्या सहकार्याने नसरापूर माळेगाव येथील 'माऊली अनाथाश्रम निराधार सेवा ट्रस्ट' नसरापूर, माळेगाव या संस्थेस ५३ हजार रुपयांची आर्थिक मदत पोकळे कुटुंबीयांकडून करण्यात आली. ही मदत संस्था चालक हभप नवनाथ महाराज निम्हण यांच्याकडे ही देणगी देण्यात आली. राज्यातील आई वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ मुलांचा सांभाळ 'माऊली अनाथाश्रम निराधार सेवा ट्रस्ट' ही संस्था करते. त्या मुलांचे शालेय आणि सांप्रदायीक शिक्षण, भोजन आणि निवासाची व्यवस्था ही संस्था करत आहे. ही मदत देण्यासाठी याप्रसंगी पोकळे परिवारातील कै. राजेंद्र यांची आई शारदा, पत्नी सुजाता, मुलगा आकाश, मुलगी अपूर्वा कड, जावई यश कड, शशिकांत पोकळे, काका डॉ.नंदकिशोर मते व पोकळे मित्र परिवार उपस्थित होता.
Web Title: Helping The Orphanage Avoiding Unnecessary Expenses
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..