अरेरे! चोर काय चोरतील याचा काय भरवसा न्हाय

रवींद्र पाटे
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

भक्ष्य सुरक्षित ठेवण्याची समस्या
गुंजाळवाडी येथे चोरट्यांनी याचप्रकारे बिबट्यासाठी भक्ष्य म्हणून ठेवलेला कोंबडा चोरून नेला होता. या कोंबड्यामुळे खैरेमळा येथील बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. बिबट्याच्या भक्ष्यावर आता चोरटेच ताव मारू लागल्याने यापुढे भक्ष्य म्हणून पिंजऱ्यात शेळी, कोंबडी ठेवताना वन विभागाला विचार करावा लागणार आहे. भक्ष्य सुरक्षित ठेवण्याची नवीन समस्या निर्माण झाली आहे, अशी माहिती वनपाल मनीषा काळे यांनी दिली.

नारायणगाव - वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवलेली कोंबडी अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचे गज कापून चोरून नेली. यापूर्वी गुंजाळवाडी येथील पिंजऱ्यातून कोंबडाचोरीची घटना घडली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिबट्याच्या भक्ष्यावरच आता चोरटे डल्ला मारू लागल्याने वन कर्मचाऱ्यांसमोर बिबट्याच्या बंदोबस्ताबरोबरच आता कोंबडीचोरांवर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे.
नारायणगाव परिसरातील आर्वी, वारुळवाडी, शिरोली, तेजेवाडी, गुंजाळवाडी, पिंपळगावतर्फे नारायणगाव, ओझर, येडगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मागील वर्षभरात या भागात बिबट्याच्या हल्ल्यात शेकडो शेळ्या, मेंढ्या, वासरे ठार झाली आहेत. येडगाव येथील गणेशनगर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळांच्या लहान मुलीचा मृत्यू झाला होता. बिबट्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांबरोबरच वन विभागाचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. 

पुणे : कोंढव्यात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने या भागात तीन पिंजरे लावले आहेत. पिंजऱ्याचे दोन भाग असतात. भक्ष्य ठेवलेला लहान पिंजरा बिबट्यासाठी असलेल्या मोठ्या पिंजऱ्याच्या शेजारी ठेवला जातो. भक्ष्य पकडण्यासाठी मोठ्या पिंजऱ्याच्या दरवाजातून बिबट्या प्रवेश करतो व अलगद अडकतो. त्यानंतर भक्ष्य असलेला पिंजरा काढून घेतला जातो. 

वारूळवाडी येथील साईबाबा मंदिर परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली होती. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी भक्ष्य ठेवलेल्या पिंजऱ्याचे कुलूप तोडून कोंबडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप न तुटल्याने कटरच्या साहाय्याने पिंजऱ्याचे गज कापून कोंबडी पळवली. गज कापल्यामुळे पिंजऱ्याचे नुकसान झाले आहे. 

वनविभागाने या ठिकाणी दुसरा पिंजरा लावला असून भक्ष्य म्हणून कोंबडीऐवजी आता कुत्रा ठेवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hen theft by thief