चिंचवडगावात ‘हेरिटेज वॉक’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पिंपरी - महापालिकेतर्फे चिंचवडगावातील सुमारे पाच किलोमीटरच्या क्षेत्रात ‘हेरिटेज वॉक’ प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यात मोरया गोसावी समाधी मंदिर, हनुमान, कालभैरवनाथ, धनेश्‍वर, श्रीराम या मंदिरांसह क्रांतिवीर चापेकर वाड्याचा समावेश आहे. यामुळे चिंचवड गावठाणासह परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. 

पिंपरी - महापालिकेतर्फे चिंचवडगावातील सुमारे पाच किलोमीटरच्या क्षेत्रात ‘हेरिटेज वॉक’ प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यात मोरया गोसावी समाधी मंदिर, हनुमान, कालभैरवनाथ, धनेश्‍वर, श्रीराम या मंदिरांसह क्रांतिवीर चापेकर वाड्याचा समावेश आहे. यामुळे चिंचवड गावठाणासह परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. 

या प्रकल्पामध्ये चापेकर चौकापासून गुरुकुलमपर्यंतचा रस्ता, केशवनगर ते काळेवाडीपर्यंतचा रस्ता, चिंचवड गावठाण असा एकूण सुमारे पाच किलोमीटर परिसराचा समावेश करण्यात आला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मान्यता मिळाल्यानंतर कामाची निविदा काढून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. सुरवातीच्या टप्प्यात सुमारे ६० कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. प्रकल्पांतर्गत गावातील जुन्या जलवाहिन्या, वीजवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या बदलण्यात येणार आहेत. हा खर्च प्रकल्पाच्या खर्चातच समाविष्ट आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ, आग्रा या शहरांच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविण्यात येईल. यासाठी आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी नुकताच या शहरांचा दौरा केला.

प्रकल्पात परिसरातील सर्व दुकानांना एकसारखे नामफलक लावण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेतर्फे दुकानदारांची लवकरच बैठक बोलाविण्यात येणार आहे. जिजाऊ उद्यानाच्या पुढील भागात ‘लाइट आणि साउंड शो’ उभारण्यात येणार आहे. पवना नदीवर थेरगाव आणि चिंचवडच्या बाजूने गोलाकार पद्धतीचा पूल बांधण्यात येणार आहे. तेथे कारंजे आणि विद्युत रोषणाईचीही व्यवस्था केली जाणार आहे. तसेच धनेश्‍वर, थेरगाव या पुलांवरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

...असे असेल प्रकल्पाचे स्वरूप
 चिंचवडगावाला पुरातन काळाचा ‘लूक’ येणार
 वाहने वेगाने जाऊ नयेत म्हणून रस्त्यावर पेबल स्टोनचा वापर
 आकर्षक पद्धतीचे सार्वजनिक दिवे
 चिंचवडगाव बस स्थानकावर ‘हेरिटेज’ नकाशा
 मोरया गोसावी यांच्या इतिहासाची लघुचित्रफित 

महापालिकेच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकात या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. या प्रकल्पासाठी सुमारे १७० कोटींचा खर्च येणार आहे. 
- प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता, ‘ब’ प्रभाग 

Web Title: Heritage Walk in Chinchwadgaon