Pune : लाडक्या चिंटूंच्या भेटीने मुलांमध्ये हर्षोल्हास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

लाडक्या चिंटूंच्या भेटीने मुलांमध्ये हर्षोल्हास

sakal_logo
By
जितेंद्र मैड

कोथरुड : कुटूंबातील सर्वांचा लाडका असलेल्या चिंटू बरोबर त्याच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्या बरोबरच फोटो काढायला मिळाल्याने बच्चे मंडळींसाठी आजचा रवीवार  हर्षोल्हासाचा आणि अत्यानंदाचा होता. निमित्त होते कोथरुडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या चिंटू अँट ३० कार्यक्रमाचे.चित्रकार चारुहास पंडित यांची सुनंदन लेले यांनी घेतलेली मुलाखत, आणि चिंटू चित्रपटात काम करणारे कलाकार शुभंकर अत्रे, मृण्मयी देशपांडे, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांची राजेश दामले यांनी घेतलेली मुलाखत, चिंटू चित्रमालिकेचे कलादालनातील प्रदर्शन अशी सगळी आनंदाची पर्वणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने बच्चेमंडळींना अनुभवायला मिळाली.

क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत चारुहास पंडित यांनी चिंटुचा प्रवास उलगडला पंडित म्हणाले की, निरिक्षणातून आपण अनुभवलेले सगळे चित्रात येते. चिंटूचा खोडकर, खट्य़ाळपणा अश्लिलतेकडे जावू नये याची आम्ही नेहमीच काळजी घेतली. शि. द. फडणीस म्हणतात चिंटू खट्य़ाळ आहे, खोडकर आहे पण तो वाह्यात नाही. ही सर्वात मोठी दाद होती. आम्ही चित्राची कधीच बँक बनवली नाही. त्यामुळे चिंटु नेहमीच ताजा वाटतो.

चिंटू ही हास्यमालिका २१ नोव्हेंबर १९९१ पासून दैनिक सकाळमधून सुरु झाला. वृत्तपत्रातून सुरु झालेला चिंटूचा प्रवास समाज माध्यमातूनही सुरु झाला. चित्रपट, मासिक, कथातून दिसत असलेला चिंटू आता नेट बरोबरच श्राव्य माध्यमातूनही आपल्याशी संवाद साधतोय. चिंटूने तीसावे वर्ष गाठले असले तरी त्याचे निरागस बालिशपण तसेच रहावे अशी भावना चाहत्यांमध्ये आहे.

श्रीरंग गोडबोले- चिंटू मधील पात्रे अस्सल आहेत. आपल्या मित्रांमध्ये सुध्दा आपल्याला ही पात्रे दिसतात. चिंटू हा सगळ्या चांगल्या गोष्टींचे समर्थन करणारा, वाईट प्रवृतींविरोधात उभा राहणारा हीरो आहे. मला हे चांगले वाटले.. जर ही पात्रे पडद्यावर बघायला मिळाली तर छान होईल असे वाटले. त्यातून हा चित्रपट केला. पहिल्या चिंटूला तुफान प्रतिसाद मिळाला. दुस-यालाही मिळाला. तिसरा चिंटू करायचा राहीलाय. तो मी नक्कीच करणार.

चिंटू चित्रपटात भुमिका केलेला शुभंकर अत्रे म्हणाला की, माझ्या नावापुर्वी चिंटू लागते. मला चिंटू म्हणून जे जगता आले ते माझ्याजीवनातील सर्वात आनंदी दिवस होते.मृण्मयी देशपांडे- मी मार्व्हलची जेवढी फॅन आहे. तेवढीच चिंटूची फॅन आहे. मी लहान असताना पेपर आला की, आई सकाळी पेपर वाचून दाखवायची. संध्याकाळी जे कोणी पाहुणे घरी येतील त्यांना मी चिंटू वाचून दाखवायचे. त्यांना आश्चर्य वाटायचे की, एवढी लहान मुलगी हे कसे वाचून दाखवते. तेव्हापासून चिंटू आमच्या मनात मुरला आहे. न बोलता बरेच काही सांगून जाणे हे चिंटूचे वैशिष्ठ्य आहे.

loading image
go to top