अन्न भोसळे

अन्न भोसळे
Published on

शाळा परिसरात ‘हाय फूड’ला लगाम
५० मीटरमध्ये विक्री केल्यास कारवाई ः अन्न व औषधे प्रशासनाची धडक मोहीम
गोरक्षनाथ बांदल ः सकाळ वृत्तसेवा
अहिल्यानगर, ता. १७ ः विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एनर्जी ड्रिंक्ससह ‘हाय फूड’ची शाळा, विद्यालये व महाविद्यालयांच्या कॅन्टीनमध्ये तसेच परिसरातील ५० मीटर अंतरात विक्री अथवा साठवणूक केल्यास आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अन्न व औषधे प्रशासनाने या प्रकारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, लवकरच राज्यभर धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त तसेच अन्न व औषधे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
आयुक्त मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुधातील भेसळखोरांवर कठोर कारवाई केली. त्यानंतर राज्यातील दुधातील भेसळ मोठ्या प्रमाणात थांबली. विविध शासकीय कार्यालयांतील कॅन्टीनची तपासणी करूनही कारवाई करण्यात आली. आता विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक ठरणाऱ्या एनर्जी ड्रिंक्ससह ‘हाय फूड’विरोधात प्रशासनाने मोर्चा वळविला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्त त्यांच्या आधिपत्याखालील शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत शाळा, विद्यालये व महाविद्यालयांच्या कॅन्टीनसह परिसरातील ५० मीटर अंतरातील हॉटेल आणि दुकानांमध्ये एनर्जी ड्रिंक्स व ‘हाय फूड’ ठेवू नये, याबाबत शैक्षणिक संस्था व्यवस्थापनाला मार्गदर्शन करणार आहेत. व्यवस्थापनानेही परिसरातील दुकानदार व हॉटेलचालकांना याबाबत सक्त निर्देश द्यायचे आहेत.
या निर्देशांचे पालन न करणाऱ्या दुकानदार किंवा हॉटेलचालकांची माहिती शैक्षणिक संस्था व्यवस्थापनाने अन्न व औषधे प्रशासनाच्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त कार्यालयाला द्यायची आहे. त्यानंतर प्रशासनाचे पथक संबंधित ठिकाणी छापे टाकून कायदेशीर कारवाई करणार आहे.

चौकट :
एनर्जी ड्रिंक्सचे फॅड घातक
एनर्जी ड्रिंक्स शरीराला अधिक ऊर्जा देतात, असा समज असला तरी त्यांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांना त्याच्या दुष्परिणामांची पुरेशी माहिती नसते. यकृत आणि किडनीवर परिणाम होण्याबरोबरच उच्च ग्लायसेमिक पेयांमुळे रक्तातील साखरेत अचानक वाढ आणि त्यानंतर अचानक घट होऊ शकते.
---------
पालक मेळाव्यात आहाराचे धडे
शिक्षक-पालक मेळाव्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संतुलित आहार कसा असावा, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच ‘हाय फूड’च्या दुष्परिणामांची माहिती पालक व विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोट :
विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक ठरणारे पदार्थ शैक्षणिक संस्थेच्या परिसरात ५० मीटर अंतरात विक्रीस ठेवण्यास बंदी आहे. शाळा परिसरात अशा वस्तूंची विक्री करणाऱ्यांनी तत्काळ विक्री बंद करावी. अन्यथा अन्न व औषधे प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई केली जाईल.
- गौरव जगताप, सहायक आयुक्त, अन्न व औषधे प्रशासन, अहिल्यानगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com