कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय आढावा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

- सील केलेल्या भागात दूध, भाजीपाला, औषधांचा पुरवठा सुरु राहील
-  स्वच्छतागृहे, गल्लीबोळ निर्जंतुकीकरण करण्यावर भर

पुणे : शहरातील सील केलेल्या भागातील नागरिकांनी संचारबंदीचे आदेश पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. या भागातील दूध, भाजीपाला, गॅस, औषधांचा पुरवठा सुरु राहील. परिसरातील स्वच्छतागृहे, गल्लीबोळ निर्जंतुकीकरण करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे, अशी माहिती उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत देण्यात आली.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कोंढवा तसेच महर्षीनगर ते आर. टी. ओ. कार्यालयापर्यंतचा जुन्या पेठांचा भाग काल मध्यरात्रीपासून सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. सील केलेल्या भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे परिसरातील अन्य नागरिकांनाही संसर्ग होण्याच्या शक्यतेने प्रशासन याबाबत अधिक सक्रिय झाले आहे. डॉक्टर, रुग्ण, अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना यातून सूट मिळेल. 

coronavirus: आजपासून बारामतीकरांची खरी परिक्षा! 
परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे, संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी स्वयंसेवी संस्था, पोलीस विभागातर्फे समुपदेशन करुन प्रशासन आपल्या पाठीशी असल्याची भावना लोकांपर्यंत पोचविणे आवश्यक आहे,अशा स्वरुपाच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. 

या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम्, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी - चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A high level overview of the sealed area of pune due to corona