esakal | भरधाव वाहनचालक ‘स्पीडगन’च्या टप्प्यात

बोलून बातमी शोधा

high speed
भरधाव वाहनचालक ‘स्पीडगन’च्या टप्प्यात
sakal_logo
By
पांडुरंग सरोदे -@spandurangSakal

पुणे : शहरानजीकच्या महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव वाहनांमुळे सातत्याने अनेक अपघातांच्या घटना घडत आहेत. मागील तीन महिन्यात १५ ते २० पादचाऱ्यांना भरधाव वाहनांमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अशा भरधाव वाहनांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. मागील साडे तीन महिन्यात साडे नऊ हजार वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

नगर रस्त्यावरील वाघोली, मुंबई बंगळुरू महामार्गावरील कात्रजजवळील जांभूळवाडी, खडकी येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्ग या तीन वेगवेगळ्या ठिकाणी मागील महिन्यात झालेल्या भरधाव वाहनांच्या अपघातांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांसह एका पादचारी महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. यापूर्वी कात्रज नवीन बोगदा ते धायरी येथील उड्डाणपुलाच्या परिसरात झालेले अपघातही भरधाव वेगामुळेच झाल्याचेही निष्पन्न झाले होते. सातत्याने होणाऱ्या अपघातांमध्ये वेगमर्यादेचे होणारे उल्लंघन हे देखील महत्त्वाचे कारण पुढे आले होते. भरधाव वाहनांमुळे अपघात होऊन, त्यामध्ये दुचाकी वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्याही मृत्यूच्या घटना घडत होत्या.

हेही वाचा: कोकणचा अस्सल हापूस थेट घरपोच! कसा ते वाचा

दरम्यान, पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून भरधाव वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी संबंधित वाहनांवर कारवाई करण्यावर भर दिला जात आहे. तीव्र उतारामुळे सर्वाधिक अपघात होत असलेल्या नवीन कात्रज बोगदा ते धायरी येथील उड्डाणपुलापर्यंतच्या परिसरामध्ये वाहतूक पोलिसांकडून ‘स्पीडगन’चा वापर करून कारवाई केली जात आहे. कारचालक, ट्रकचालकांना कारवाईचा मेसेज गेल्यामुळे त्यांच्यामध्ये पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच भीती निर्माण झाली आहे. भरधाव ट्रक चालविणाऱ्यांच्या वेगावर नियंत्रण येण्यासाठी त्यांच्यावरही वाहतूक पोलिसांकडून अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. १ जानेवारी ते १५ एप्रिल २०२१ या कालावधीपर्यंत नऊ हजार ५४२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर मागील वर्षी ११ हजार सहाशे ७४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

कात्रज ते धायरीपर्यंतच्या परिसरात सातत्याने अपघात होत असल्याने तिथे उपाययोजना केल्या. त्याचबरोबर भरधाव वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ‘स्पीडगन’चा वापर करून कारवाई केली जात आहे. दररोज किमान १०० ते १५० वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामुळे शहरानजीकच्या भागातून मर्यादित वेगातच वाहने चालविण्याचा धडा वाहनचालकांना मिळत आहे. त्यामुळे अपघात कमी होऊन, जीवितहानीही कमी होण्याची शक्‍यता आहे.

राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.

भरधाव वाहनांवर केलेली कारवाई

वर्ष, कारवाई केलेली वाहने, आकारलेला दंड

२०२०, ११ हजार ६७४, १ कोटी १६ लाख ७६ हजार

१५ एप्रिल २०२१ पर्यंत, ९ हजार ५४२, ९५ लाख ४४ हजार