तस्करीत कासवाला सर्वाधिक मागणी

अक्षता पवार
Thursday, 4 March 2021

अंद्धश्रद्धेपोटी केलेल्या प्राण्यांच्या तस्करीत कासवाला सर्वांत जास्त मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन वर्षांत कासवांच्या तस्करीचे ३० प्रकार उघड झाले आहेत. मात्र, वन विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या दक्षतेमुळे यातील अनेक कासवांना सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

घरात पैशांचा पाऊस पडण्याच्या अंधश्रद्धेपोटी वाढते प्रकार
पुणे - अंद्धश्रद्धेपोटी केलेल्या प्राण्यांच्या तस्करीत कासवाला सर्वांत जास्त मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन वर्षांत कासवांच्या तस्करीचे ३० प्रकार उघड झाले आहेत. मात्र, वन विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या दक्षतेमुळे यातील अनेक कासवांना सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

घरात पैशांचा पाऊस पडावा, रोगराई दूर करण्यासाठी, कासवाचे मांस, काळा जादू सारख्या गैरसमज आणि इतर अंधश्रद्धेपोटी कासवांना मोठी मागणी आहे. त्यासाठी अगदी लाखो रुपये देखील मोजले जात असल्याचे याबाबत केलेल्या कारवार्इतून स्पष्ट झाले आहे. या सर्वांत २० व २१ नखी कासवाची मागणी सर्वाधिक आहे. याबाबत पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले की, तस्करी दरम्यान सापडलेल्या प्राण्यांना किंवा पक्ष्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी ते शारीरीकरित्या तंदुरुस्त आहेत की नाही, याची पाहणी केली जाते. जर एखाद्या प्राण्याला इजा झाली असेल तर त्या प्राण्यावर उपचार सुरु केले जातात. तसेच काही काळासाठी त्यांना कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात ठेवून, पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडले जाते. गेल्या तीन वर्षामध्ये तस्करी दरम्यान बहुतांश प्राण्यांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२०१८ ते २०२० पर्यंत तस्करी केलेले प्राणी 
प्राणी किंवा पक्षी      संख्या      जिवंत ताबा अथवा मृत्यू

कासवे                      ३०          जिवंत व नैसर्गिक अधिवासात सोडले
बिबट्या                     १            मृत
रानडुक्कर                 २            मृत
खवले मांजर               १           जिवंत आणि नैसर्गिक अधिवासात सोडले
चिंकारा                     ३           २ मृत, १ जिवंत आणि नैसर्गिक अधिवासात सोडले
मांडूळ                      २           जिवंत आणि नैसर्गिक अधिवासात सोडले

तस्करीची कारणे 

  • सजावटीसाठी मोर व इतर पक्ष्यांचे पिसे
  • औषधांसाठी खवली मांजराची खवले
  • शोभेसाठी वाघ, बिबटे यांची हाडे आणि कातडी
  • चिंकाराची शिंगे, कातडी
  • चांगल्या आरोग्यासाठी रानडुक्करांचे मांस
  • मुंगसाच्या केसांपासून ब्रश तयार करण्यासाठी
  • जादूटोण्यासाठी मांडूळ, कासव व घोरपड

पुण्यात 24 तासात आगीची दुसरी घटना; बिबवेवाडीत मंडप सजावटीच्या गोदाम भस्मसात

गेल्या दहा- पंधरा वर्षांपासून कासव, मांडूळ सारख्या प्राण्यांची मागणी वाढली आहे. गुप्तधनाचे आमिष दाखवून त्यांची तस्करी केली जाते. बऱ्याचवेळी या प्राण्यांची माहिती नसल्यामुळे त्यांना सर्रासपणे चुकीचे अन्न दिले जाते. त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. परिणामी आता कासव, मांडूळ, खवली मांजर हे प्राणी दुर्मिळ होत चालले आहेत.
- मिलिंद देशमुख , अंधश्रद्धा निर्मूलन समिती

वैद्यकीय किंवा अंधश्रद्धेमुळे जिल्ह्यात कासवाप्रमाणे, मांडूळ व खवली मांजराची तस्करी जास्त होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्राण्यांची मागणी असेल या खोट्या आशेपोटी प्राण्यांची तस्करी व शिकार केले जाते. आर्थिक अडचण असलेले किंवा झटपट पैसे कमविण्यासाठी हा मार्ग निवडला जातो. मात्र, त्यांचे हे प्रयत्न फोल ठरत आहेत.
- दीपक पवार, वन परिक्षेत्र अधिकारी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: highest demand for smuggled tortoise