हिमाचलचे सफरचंद आवाक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

apple

फळबाजारात सिमला सफरचंदाची दररोज १५ ते १६ गाड्यांमधून ८ ते १० हजार बॉक्सची आवक होत आहे.

हिमाचलचे सफरचंद आवाक्यात

पुणे - हिमाचल प्रदेशातील सफरचंदाचा हंगाम फळबाजारात सुरू झाला आहे. परदेशीबरोबर देशी सफरचंदाची आवक सुरू झाल्याने तीन ते चार महिन्यांपासून तेजीत असलेले सफरचंदाचे भाव कमी झाले आहेत.

फळबाजारात सिमला सफरचंदाची दररोज १५ ते १६ गाड्यांमधून ८ ते १० हजार बॉक्सची आवक होत आहे. जगाच्या कानाकोपऱ्‍यातून येणाऱ्‍या सफरचंदाचे दर इतके असतात की दररोज सफरचंद खाणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. परंतु, हिमाचल येथील सफरचंद बाजारात आल्यानंतर ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याची माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

सफरचंदाचे गुणधर्म आणि त्याच्या मागणीचा विचार करता बाजारात वर्षभर सफरचंद पाहायला मिळतात. पावसाळा हा भारतीय सफरचंदाचा मुख्य हंगाम असतो. दोन महिन्यांपूर्वी सफरचंदाची २०० ते २५० रुपये प्रतिकिलो भावाने विक्री होत होती. बाजारात सफरचंदाची आवक वाढेल, तसे दर कमी होतील. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर आणि दर्जा चांगला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

येथून होते सफरचंदांची आवक

हिमाचल प्रदेशातील शिमला, पराला, कोटखाई, रोडू, डल्ली, सोलन, नारखंडा, कुल्लू, मनाली, रामपूर येथून पहिल्या टप्प्यात सफरचंदांची आवक होते. तसेच चंडीगड येथूनही आवक होत आहे. सद्यःस्थितीत हिमाचल प्रदेश येथून रिचर्ड, रॉयल गाला, रेड गोल्ड, रेड डेलीसेस, व्हरायटी हे भारतीय सफरचंद बाजारात येत असल्याने परदेशी सफरचंदाच्या मागणीत घट झाली आहे. परदेशी सफरचंदाच्या तुलनेत देशी सफरचंदाचे भावही तुलनेने कमी आहेत.

विविध देशातून सफरचंद बाजारात

फळबाजारात वॉशिंग्टन, अर्जेंटिना, चिली, इराण, इटली, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका येथून वर्षभर परदेशी सफरचंदाची आवक होते. शीतगृहात साठवणूक केलेली ही सफरचंदे मागणीनुसार बाजारात विक्रीसाठी आणली जातात. त्याचा वाहतूक आणि साठवणूक खर्च अधिक असल्याने त्यांचे किरकोळ बाजारात येईपर्यंतचे दर वाढतात.

भारतीय सफरचंद तिसऱ्या दिवशी बागेतून थेट बाजारात येतात. त्यांचा वाहतूक खर्च परदेशी सफरचंदांच्या मानाने कमी आहे. त्यामुळे बाजारात त्यांचे दरही कमी आहेत. दिवाळीपर्यंत भारतीय सफरचंदांचा हंगाम सुरू राहणार आहे. हळूहळू ही आवक वाढेल.

- अरविंद मोरे, व्यापारी, मार्केट यार्ड

दर्जानुसार घाऊक बाजारातील सफरचंदांचे भाव

२५ ते ३० किलोची पेटी १८००-३०००

दर्जानुसार किरकोळ बाजारातील सफरचंदांचे भाव

एक किलो ८०-१६०

Web Title: Himachal Pradesh Apple Season Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Himachal Pradeshpuneapple