

हिंजवडी, ता. ७ : हिंजवडी-माणमधील आयटी कंपन्यांमधील बहुतांश कर्मचारी व अन्य कामगार दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या मूळगावी रवाना झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. दररोज वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांसह स्थानिक रहिवाशांना काही दिवसांसाठी दिलासा मिळाला आहे.
हिंजवडी-माण आयटी पार्क परिसर वर्षभर वाहनांच्या गर्दीने गजबजलेला असतो. रस्त्यांवर हजारो वाहने धावत असतात. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ कार्यालयीन वेळांमध्ये नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. सध्या दिवाळीच्या सुट्या सुरू असल्याने हिंजवडी-माण परिसर तुलनेने शांत झाला आहे. हिंजवडी फेज एक, दोन आणि तीनसह माण, मारुंजी, वाकड, भूमकर चौक, लक्ष्मी चौक, विप्रो सर्कल आणि भुजबळ चौक या प्रमुख मार्गांवर नेहमीच्या तुलनेत वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत होणारी वाहनांची गर्दीही ओसरली आहे. अनेक प्रमुख चौकांत वाहने रांगेत अडकण्याऐवजी रस्त्यांवरून सहज मार्गक्रमण करताना दिसत आहेत. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत या परिसरातील वाहतुकीचे चित्रच बदलले आहे.
रहदारीचा कायम ताण
हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज सुमारे पाच ते सहा लाख नागरिकांची ये-जा होत असल्याने या परिसरातील रस्त्यांवर कायम वाहनांचा ताण असतो. अपुरे रस्ते, अरुंद मार्ग, चौकांमधील अडथळे आणि वाढती वाहनसंख्या यामुळे प्रवाशांना अनेकदा तास न् तास वाहतूक कोंडीत अडकावे लागते. मात्र, आता या वाहतुकीच्या ताणात तात्पुरती घट झाल्याने वाहनांच्या गर्दीऐवजी शांततेचे चित्र पसरले आहे.
मेट्रोचा नवा पर्याय
विशेषतः भूमकर चौक, लक्ष्मी चौक, विप्रो सर्कल आणि हिंजवडीतील अंतर्गत रस्त्यांवर याचा परिणाम जाणवत आहे. नेहमी हॉर्नचा कर्कश आवाज, वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि धावपळ दिसणाऱ्या या रस्त्यांवर सध्या शांतता अनुभवायला मिळत आहे. नुकतीच सुरू झालेली हिंजवडी-माण-शिवाजीनगर मेट्रो सेवाही या परिसराच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. आयटी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ८ नोव्हेंबरला मेट्रोच्या वेळापत्रकातही विशेष बदल करण्यात आला असून, प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोंडीमुक्त रस्ते कधी ?
हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने सहा प्रमुख रस्त्यांच्या विकासाचे नियोजन केले असून, भूसंपादन आणि अन्य प्रक्रियांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. दिवाळीमुळे काही दिवसांसाठी का होईना, हिंजवडी-माण परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, दरवर्षी सणासुदीच्या सुट्ट्यांमध्येच अनुभवायला मिळणारी ही कोंडीमुक्ती कायमस्वरूपी व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.