Pune News : शरद पवारांचा एक निर्णय : आज दोन लाख कोटींची होतेय उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News

Pune News : शरद पवारांचा एक निर्णय : आज दोन लाख कोटींची होतेय उलाढाल

बारामती : हिंजवडीच्या परिसरात नानासाहेब नवले यांनी साखर काऱखान्याची जागा सॉफ्टवेअर पार्कसाठी देऊ करण्याचा एक निर्णय घेतला, पण त्या निर्णयामुळे आज दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल या परिसरात होत आहे, औद्योगिकीकरणाला चालना देणारे असे निर्णय होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

बारामती मर्चंटस असोसिएशनने आयोजित केलेल्या भाषणात शरद पवार यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, नानासाहेब नवले यांनी साखर कारखाना उभारण्यासाठी मला भूमीपुजनाला बोलावले होते, त्या कार्यक्रमाअगोदर मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांनी पुण्याशेजारी सॉफ्टवेअर उद्योगासाठी जागा हवी आहे, यात मोठा वाव आहे, असे भेट घेऊन सांगितले होते.

त्या मुळे भूमीपुजनामध्येच नानासाहेब नवले यांना या जागी तुम्ही कारखाना सुरु करु नका, या ऐवजी तुम्हाला पर्यायी जागा देतो तेथे तुम्ही कारखाना सुरु करा.... असे सुचविले. नानासाहेब नवले यांनीही तत्काळ ती विनंती मान्य करत त्यांच्या कारखान्याची जागा सॉफ्टवेअर उदयोगासाठी देऊ केली.

याचा परिणाम असा झाला की पुण्याचा सॉफ्टवेअर उद्योगाची उलाढाल व निर्यात आज दोन लाख कोटी रुपयांवर गेलेली आहे. केवळ एक छोटासा बदल करण्यास सांगितल्याने हे चित्र बदलले, जागा मिळालेली असतानाही मराठा चेंबरच्या विनंतीवरुन नवले यांनी त्यांच्या कारखान्याची जागा बदलली, आज या निर्णयामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला असून पुणे पंचक्रोशीतील अर्थकारण सशक्त झाले आहे. ज्या निर्णयामुळे पुण्याची समृध्दी वृध्दींगत झाली त्या निर्णयांपैकी हा एक ठरला. त्या नंतर हिंजवडी परिसरात अनेकांनी सॉफ्टवेअर उद्योगांची उभारणी केली, आज दोन लाख लोक या ठिकाणी काम करतात. उद्योगांना अशा पध्दतीने चालना देण्याची गरज शरद पवार यांनी या प्रसंगी बोलून दाखविली.