esakal | Women's Day : परिपूर्ण जीवनशैलीसाठी महिलांना सर्वंकष सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

संत तुकारामनगर, पिंपरी - डॉ. डी.वाय. पाटील इन्स्स्टिट्यूट फार्मसी येथे आयोजित सकाळ ‘यिन’ कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थिनी व शिक्षिका.

‘‘महिलांनो, आरोग्य सांभाळा. कठीण परिस्थितीत कधीही हतबल होऊ नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. कौटुंबिक व नोकरी, अशा दुहेरी जबाबदारीचे नियोजन करा अन्‌ स्वत्व जपा,’’ असा आग्रही सल्ला आरोग्य व सुरक्षा क्षेत्रातील महिला वक्‍त्यांनी दिला.

Women's Day : परिपूर्ण जीवनशैलीसाठी महिलांना सर्वंकष सल्ला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘‘महिलांनो, आरोग्य सांभाळा. कठीण परिस्थितीत कधीही हतबल होऊ नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. कौटुंबिक व नोकरी, अशा दुहेरी जबाबदारीचे नियोजन करा अन्‌ स्वत्व जपा,’’ असा आग्रही सल्ला आरोग्य व सुरक्षा क्षेत्रातील महिला वक्‍त्यांनी दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शनिवारी (ता. ७) पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च व ‘सकाळ’ यंग इनस्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) ‘महिला दिन’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक रोहिणी शेवाळे, स्त्रीरोगतज्ज्ञ वैजयंती पटवर्धन, उद्योजिका सई केसकर सहभागी झाल्या. या वेळी प्राचार्य सोहन चितलांगे, विभागप्रमुख संतोष भुजबळ उपस्थित होते.

शेवाळे म्हणाल्या, ‘वाईट परिस्थितीत महिलांनी खचून न जाता धैर्याने सामना करावा. अविचार न करता रागावर नियंत्रण ठेवावे. आपल्यातले चांगले गुण ओळखून ते जोपासावेत. विवाहानंतर एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये विचारांमध्ये फरक असतो. अशा वेळी संयम ठेवून योग्य निर्णय घ्यायला शिकावे. महिलांमध्ये समजूतदारपणा हवा. पण, सहनशीलतेचा अतिरेक नको; ज्यामुळे अन्यायाला बळी पडावे लागेल.’

केसकर म्हणाल्या, ‘कोणताही व्यवसाय करताना यश-अपयश येतच राहते. त्यामुळे वेळेचे उत्तम व्यवस्थापन आणि कायम सकारात्मक विचार करायला हवेत. आयुष्यात चढ-उतार येतच असतात. अशावेळी योग्य नियोजन हवे. प्रत्येक दिवस हा आयुष्यात वेगळा असतो. मात्र, कोणताही व्यवसाय करताना वैयक्तिक व कौटुंबिक जबाबदारी जपता यायला हवी.’

डॉ. पटवर्धन म्हणाल्या, ‘अनियमित मासिक पाळी तसेच वयानुरूप होणारे शारीरिक बदल, यामुळे महिलांमध्ये चिडचिडेपणा वाढतो. तरुण वयात मुलींनी योग्य आहार घ्यायला हवा. जीवनात येणाऱ्या ताणतणावांचे योग्य व्यवस्थापन करावे. व्यायामावर अधिक भर द्यावा. खास म्हणजे, तरुणींनी व्यसनापासून दूर राहायला हवे. मुलींनी थायरॉइड व पीसीओडी याचा न्यूनगंड न बाळगता वजन आटोक्‍यात ठेवायला 
हवे. 

सकाळ ‘यिन’ उपक्रमाची माहिती कोविद बेडेकर यांनी दिली. दीक्षा वाघचौडे, करिष्मा गाडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आशा थॉमस यांनी संयोजन केले. डॉ. स्नेहा चंदानी यांनी आभार मानले.

loading image