तीन महिन्यांपासून होमगार्ड जवान पगाराविना; आता दिवाळी तरी गोड होणार का?

निलेश बोरुडे
Wednesday, 11 November 2020

अनेक दिवस पगार मिळत नसल्याने हालाखीचे जीवन जगावे लागत असले तरी उघडपणे तक्रार करण्यास होमगार्ड जवान पुढे येत नाहीत. अडचणीच्या काळात आहे ते काम तक्रार केल्यामुळे हातातून जाईल अशी भीती होमगार्ड जवानांकडून व्यक्त केली जात आहे.

किरकटवाडी (पुणे) : पुणे जिल्ह्यातील वाहतूक नियोजन, विविध ठिकाणी लावण्यात आलेले वाहन तपासणी केंद्रे, कोविड सेंटर वरील बंदोबस्त, विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रात्रगस्त, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी लावण्यात आलेला बंदोबस्त, आरोपींची पोलिस ठाण्यातून कोर्टापर्यंत ने-आण करण्यासाठी सुरक्षा पुरवणे अशा विविध कामांसाठी तैनात करण्यात आलेले होमगार्डचे जवान मागील तीन महिन्यांपासून पगाराविना राबत आहेत. आता किमान दिवाळीत तरी पगार मिळावा, अशी अपेक्षा होमगार्डच्या जवानांकडून व्यक्त केली जात आहे.

'मी अर्णब गोस्वामींचा चॅनेल पाहत नाही पण...'; काय म्हणाले न्यायमूर्ती चंद्रचूड?

सध्या पुणे ग्रामीण व शहरी हद्दीत मिळून 2615 पुरुष व 238 महिला असे एकूण 2853 होमगार्ड आपली सेवा देत आहेत. यातील काही होमगार्ड जवानांचे पगार जुलै महिन्यापासून झालेले नाहीत तर जवळपास सर्वच होमगार्ड जवानांचे पगार ऑगस्ट महिन्यापासून होण्याचे बाकी आहेत. दैनंदिन हजेरीवर काम करणाऱ्या अनेक होमगार्डच्या जवानांची घरची परिस्थिती हलाखीची आहे. 'लॉकडाउन' कालावधीमध्येही होमगार्ड जवानांनी जीवावर उदार होऊन प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली; परंतु तेव्हाही पगारासाठी तीन ते चार महिन्यांचा विलंब झाला होता. दिवाळी तोंडावर आलेली असताना पगार होत नसल्याने सणाची खरेदी कशी करायची? या चिंतेत सध्या होमगार्ड जवान आहेत.

मॅट्रीमनी साइटवर शोधलेला जोडीदार निघाला भामटा; महिलेची 9 लाखांची फसवणूक​

तक्रार केली तर आहे ते काम जाण्याची भीती...
अनेक दिवस पगार मिळत नसल्याने हालाखीचे जीवन जगावे लागत असले तरी उघडपणे तक्रार करण्यास होमगार्ड जवान पुढे येत नाहीत. अडचणीच्या काळात आहे ते काम तक्रार केल्यामुळे हातातून जाईल अशी भीती होमगार्ड जवानांकडून व्यक्त केली जात आहे. पगार नाही मिळाला तरी चालेल परंतु आमचे नाव छापू नका अशी हतबलताही होमगार्ड जवानांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी होमगार्ड जवानांच्या भावना समजून घेऊन येत्या दोन-तीन दिवसांमध्ये पगाराचा विषय मार्गी लावावा अशी अपेक्षा.

"अनुदान नसल्याने होमगार्ड जवानांचे पगार रखडले होते. आज अनुदान जमा झाल्याने तातडीने पगार बिले तयार करण्यात आलेली आहेत. संपूर्ण पगार बिलांवर सह्या करून ट्रेझरी मध्ये पाठविण्यात येतील. दिवाळीच्या अगोदर सर्व होमगार्ड जवानांच्या खात्यामध्ये पगार जमा व्हावा यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत."
- विवेक पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home guards have been working without payment from three months