गेल्या सहा महिन्यांत घरांच्या विक्रीत 42  टक्क्यांची घट

सनील गाडेकर
गुरुवार, 16 जुलै 2020

गेल्या दहा वर्षांचा विचार केला असता या वर्षी पहिल्या सहामाहीत सर्वाधिक कमी घरांची विक्री झाली आहे.

पुणे, ता. 16 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन, गृहकर्जाबाबत बँकांच्या मनात असलेली धास्ती, अचानक वाढलेली बेरोजगारी आणि पगार कपातीच्या संकटामुळे गेल्या सहा महिन्यांत शहरातील घरांच्या विक्रीत 42 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या दहा वर्षांचा विचार केला असता या वर्षी पहिल्या सहामाहीत सर्वाधिक कमी घरांची विक्री झाली आहे.

'नाइट फ्रँक इंडिया' ने प्रसिद्ध केलेल्या 'इंडिया रिअल इस्टेट'  अहवालातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. जानेवारी-जून या कालावधीत देशातील आठ मोठ्या शहरांमध्ये कार्यालय आणि निवासी बाजारपेठेच्या व्यवहाराचे विश्लेषण या अहवालात मांडण्यात आले आहे. यावर्षी पुण्यात जूनअखेरीस केवळ 10 हजार 49 घरांची विक्री झाली आहे. जून अखेरीस नवीन कार्यालयांच्या पुरवठ्यात 87 टक्के घट आहे. तर लॉकडाउनमुळे घरून काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भाड्याने ऑफिस घेण्याच्या प्रमाणात 47 टक्‍क्‍यांनी घटल्याचे समोर आले आहे.

हे वाचा - पुणे कॅन्टोन्मेट एक ऑगस्टपासून ऑनलाइन सेवा पुरविणार

कार्यालयीन बाजारपेठेची स्थिती : 
- ऑफिसच्या व्यवहारांमध्ये झालेली प्रचंड वाढ लॉकडाऊनमुळे ठप्प
-  ऑफिसच्या व्यवहारांत 47 टक्क्यांनी घट झाली असून ते 2.1 दशलक्ष चौ.फुटांवर आले
- ज्यांच्याकडे ऑफिस आहेत त्यांनी ते भाड्याने देऊन टाकले आहे. त्यामुळे रिक्त जागांची पातळी 4.7 टक्क्यांनी वाढली.
-  कल्याणी नगर, येरवडा, नगर रोड, हडपसर या भागात भाड्याची रक्कम सर्वाधिक वाढली
-  आगामी तिमाहींमध्ये भाड्याच्या बाबतीत शहरात घट होणार असून जागा मालक विस्तार योजना पुढे ढकलतील 
- गरजेच्या तुलनेत कमी रिक्त जागांच्या पातळीमुळे संयुक्तपणे वापरण्याच्या जागांना मोठी मागणी 
- एकत्र काम करण्याच्या टक्केवारीत स्टार्टअप आणि एसएमईमुळे वाढ झाली आहे. 

हे वाचा  - आईने सांगितला तसा अभ्यास केला आणि बोर्डाच्या परीक्षेत पहिला आला

निवासी बाजारपेठेची स्थिती : 
- नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या प्रमाणात वार्षिक 37 टक्क्यांची घट झाली, तर विक्री 42 टक्क्यांनी कमी झाली
- विकासकांनी काही मर्यादेत किंमती कमी केल्या आहेत. अंतिम चर्चेत त्यात आणखी घट करायची तयारी 
- उद्योगाची अर्थव्यवस्था कायम राखण्यासाठी विकसक विविध प्रकारचे ऑफर्स देत आहेत
- घर घेणाऱ्यांची पसंती आजही रेडी-टू-मूव्ह इन घरांना
- न विकली गेलेली मालमत्ता वार्षिक पातळीवर 43 टक्क्यांनी वाढून 42 हजार 855 युनिट्सपर्यंत गेली.

वर्ष       पहिल्या सहामाहीत घरांची विक्री 

 1. 2010      17,977
 2. 2011       24,921
 3. 2012      23, 122
 4. 2013       20, 937
 5. 2014        14, 719
 6. 2015        15,524
 7. 2016       15,688
 8. 2017         17,480
 9. 2018         16, 451
 10. 2019         17, 364
 11. 2020         10,049

उत्पादन आणि ऑटो क्षेत्राचा पुण्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. या दोन्हीवर लॉकडाऊनचा व त्यामुळे अंतिम वापरकर्त्यांच्या खरेदीच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कंपन्या आपल्या विस्तार योजना थांबवल्या आहेत. भाडेकरूंनी जागा सोडल्यास बाजाराची परिस्थिती आणखी कठीण होण्याची शक्यता आहे.
- परमवीर सिंग पॉल
संचालक, नाइट फ्रँक इंडिया, पुणे शाखा

 घर खरेदी कमी होण्याची कारणे : 
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन 
- गृहकर्जाबाबत बँकांच्या मनात असलेली धास्ती - अचानक वाढलेली बेरोजगारी आणि पगार कपातीचे संकट
         


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Home sales 42 percent down in last six months