ड्रेनेजमध्ये पडलेल्या घोड्याची अग्निशमनदलाकडून सुटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

एम. एच. हॉस्पिटल रेंजहिल येथील  धोबिघाट जवळ राहणाऱ्या निसार शेख यांनी त्यांच्या मालकीचा घोडा नेहमीप्रमाणे चरण्यासाठी सोडला होता. चरता चरता मैदानात असलेल्या उघड्या चेंबरमध्ये घोडा अचानक पडला.

खडकी बाजार (पुणे) : चरायला सोडलेला घोडा अचानक उघड्या ड्रेनेजमध्ये पडला. त्याला खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी पाऊण तासाच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. ही घटना रेंजहिल येथील एम. एच. हॉस्पिटल समोरील मैदानात घडली.

एम. एच. हॉस्पिटल रेंजहिल येथील  धोबिघाट जवळ राहणाऱ्या निसार शेख यांनी त्यांच्या मालकीचा घोडा नेहमीप्रमाणे चरण्यासाठी सोडला होता. चरता चरता मैदानात असलेल्या उघड्या चेंबरमध्ये घोडा अचानक पडला. घोडा चेंबरमध्ये पडलेला पाहून शेख यांनी त्वरित मुख्य अग्निशामक दलाला कळवले. अग्निशामक दलाने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाला सदर माहिती दिली. त्यानंतर लगेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचून घोड्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

बोर्डाच्या आरोग्य विभागाच्या डंपरला दोरी बांधून वर-खाली करीत अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना घोड्याला ड्रेनेज मधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. 

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य अधीक्षक बी. एस. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाचे कर्मचारी सतीश कांबळे, पंकज तायडे, राजेश कल्याणा, विशाल भोसले, आनंद झेंडा, निलेश इंदूरकर यांनी घोड्याची सुटका करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: horse stuck in open drainage in Khadki Pune