Kalyaninagar Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल! फिर्यादीत काय म्हटले?

कल्याणीनगर भागात भरधाव मोटार चालवून दोघांचा बळी घेणाऱ्या आरोपीकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. शिवाय मुलगा अल्पवयीन असूनही धनाढ्य बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अग्रवाल यांनी बेजबाबदारपणे त्याला गाडी चालविण्यास दिली; यामुळे पोलिसांनी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Kalyaninagar Accident
Kalyaninagar Accidentsakal

पुणे : कल्याणीनगर भागात भरधाव मोटार चालवून दोघांचा बळी घेणाऱ्या आरोपीकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. शिवाय मुलगा अल्पवयीन असूनही धनाढ्य बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अग्रवाल यांनी बेजबाबदारपणे त्याला गाडी चालविण्यास दिली; यामुळे पोलिसांनी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही हॉटेलमालकांसह व्यवस्थापकाविरुद्धही गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मुलाच्या वडिलांचा ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ तोडकरी यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संशयित अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल, कोझी हॉटेलचा मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर, हॉटेल ब्लॅकचा मालक संदीप रमेश सांगळे आणि बार काउंटर व्यवस्थापक जयेश सतीश बोनकर अशा पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

रविवारी (ता. १९) पहाटे अडीचच्या सुमारास कल्याणीनगर-एअरपोर्ट रस्त्यावरील लॅंडमार्क सोसायटीजवळ भरधाव राखाडी रंगाची आलिशान पोर्श मोटारीने दुचाकीला धडक दिली. त्यात आयटी अभियंते अनिष अवधिया (वय २४, रा. पाली, मध्य प्रदेश) आणि त्याची मैत्रीण अश्‍विनी कोस्टा (वय २४, रा. जबलपूर, मध्य प्रदेश) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध (वय १७ वर्षे आठ महिने) गुन्हा दाखल झाला. त्याला रविवारी न्यायालयाने जामीन दिला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अल्पवयीन आरोपी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानिमित्त पार्टी करण्यासाठी तो शनिवारी (ता. १८) रात्री साडेनऊच्या सुमारास दहा-बारा मित्रांसमवेत मुंढव्यातील एबीसी रस्त्यावरील कोझी हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला. त्यांनी मद्य आणि खाद्यपदार्थ ऑर्डर केले. कोझी हॉटेलचा मालक नमन भुतडा आणि व्यवस्थापक सचिन काटकर यांनी अल्पवयीन आरोपी मुलासह त्याच्या मित्रांना मद्य दिले.

त्यानंतर ते मध्यरात्री बारा वाजता मुंढव्यातील हॉटेल ब्लॅकमध्ये आल्याचे हॉटेलचा मालक संदीप सांगळे आणि बार काउंटर व्यवस्थापक जयेश बोनकर यांनी सांगितले. परंतु अल्पवयीन असूनही खात्री न करता त्यांना मद्य पुरवले. यावरून पोलिसांनी दोन्ही हॉटेल मालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अल्पवयीन आरोपीने मोटार चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेले नाही. त्याच्याकडे वाहन परवानाही नाही. असे असताना वडील विशाल अग्रवाल यांनी अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास दिली. हे कृत्य बाल न्याय अधिनियम २०१५चे कलम ७५, ७७ प्रमाणे आणि मोटार वाहन अधिनियम १९८८चे कलम ३, ५, १९९ (अ) नुसार गुन्हा असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

फिर्यादीत म्हटले आहे...

  •  अल्पवयीन आरोपीने मोटार चालविण्याचे

  • प्रशिक्षण घेतलेले नाही

  •  आरोपी मुलाकडे मोटार वाहन परवाना नाही

  •  जीवितास धोका होऊ शकतो हे माहीत असताना वडिलांनी मुलाला मोटार चालविण्यास दिली

  •  हॉटेलमालक, व्यवस्थापकाने मद्य पुरविण्यापूर्वी मुले अल्पवयीन असल्याची खात्री केली नाही

  •  दोन्ही हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य दिले

पोलिसांची तत्परता कोणामुळे?

दोन निष्पाप तरुण-तरुणीचा बळी जाऊनही पोलिसांनी संशयित अल्पवयीन आरोपीला रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर केले. सुट्टीच्या दिवशी न्यायालयात हजर करण्याची पोलिसांनी इतकी तत्परता कोणामुळे दाखवली? असा प्रश्न विचारत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com