esakal | ‘जॅक’ लावून उचलला बंगला
sakal

बोलून बातमी शोधा

बी.टी.कवडे रस्ता - ताराचंद कॉलनीतील भारद्वाज बंगल्याला २५० जॅक लावून तो जमिनीपासून चार फूट वर उचलला आहे.

‘जॅक’ लावून उचलला बंगला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पंक्‍चर किंवा दुरुस्तीसाठी ‘जॅक’ लावून चारचाकी गाडी वर उचलण्यात आल्याचे आपण नेहमी पाहतो. परंतु, बी. टी. कवडे रस्त्यावरील ताराचंद कॉलनीत पावसाचे पाणी घरात शिरून नये; म्हणून अडीचशे जॅक लावून एक बंगला जमिनीपासून चार फूट वर उचलण्यात आला आहे. नागरिकांमध्ये हा विषय चर्चेचा आणि कुतूहलाचा बनला आहे.

या बंगल्याचे क्षेत्रफळ सुमारे दोन हजार चौरस फूट असून, त्याचे नाव ‘भारद्वाज’ असे आहे. याबाबत माहिती देताना बंगल्याचे मालक शिवकुमार म्हणाले, की महापालिकेकडून गेल्या काही वर्षांत या बंगल्याजवळील रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. यामुळे बंगल्यापेक्षा रस्त्याची उंची वाढली आहे. यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील पावसाचे पाणी घरात शिरत होते. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी इंटरनेटवर ‘हाउस लिफ्टिंग’ तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. त्यानंतर घराच्या तळात जॅक लावून त्याची उंची वाढविण्याचे काम मी हरियानातील बांधकाम व्यावसायिक बलवान सिसोदिया यांना दिले. येत्या पंधरा दिवसांमध्ये घराची उंची वाढविण्याचे काम पूर्ण होईल.

सिसोदिया म्हणाले, ‘‘सध्या काम सुरू असलेले घर सिमेंट-काँक्रीटचे आहे. घराच्या चारही बाजूला काही फुटांपर्यंत खोदकाम करून सुमारे २५० स्टीलचे जॅक लावून हे घर सुरक्षित जमिनीपासून वर उचलले आहे. यामुळे मूळ बांधकामाला कोणत्याही प्रकारचा धोका पोचणार नाही. यावर आणखी एक मजल्याचे बांधकामदेखील सहज पेलू शकेल, इतकी क्षमता या जॅकमध्ये आहे. दिल्ली आणि हरियानात ‘हाउस लिफ्टिंग’ची कामे केली जातात. पुण्यामध्ये बहुतेक हे पहिलेच असावे.’’

नेटवर सापडले समस्येचे समाधान!
रस्त्याची उंची वाढल्यामुळे दर वर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यावरील पावसाचे पाणी थेट घरामध्ये शिरण्याचा त्रास शिवकुमार यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना सहन करावा लागत होता. त्याला वैतागून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा शोधण्यासाठी शिवकुमार यांना इंटरनेटची मदत घेतली. ‘हाउस लिफ्टिंग’ तंत्रज्ञानाद्वारे या समस्येवर मात करणात येणार असल्याचे समाधान शिवकुमार यांनी व्यक्त केले आहे.

loading image
go to top