मुख्यमंत्रिपदाची संधी कशी सोडेन : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

पक्षाने सांगितले तर आपण गडचिरोलीमधूनही विधानसभा निवडणूक लढविण्यास तयार आहोत. त्याचबरोबर पक्षाने मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिल्यास ती संधी कशी सोडेन? नक्कीच ते पद स्वीकारेन, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.   

पुणे -  पक्षाने सांगितले तर आपण गडचिरोलीमधूनही विधानसभा निवडणूक लढविण्यास तयार आहोत. त्याचबरोबर पक्षाने मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिल्यास ती संधी कशी सोडेन? नक्कीच ते पद स्वीकारेन, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.   

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते. विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची संघटनात्मक बांधणी, इतर पक्षांतून भाजपमध्ये येत असलेले नेते आणि आगामी वाटचाल याबाबतचा आढावा त्यांनी या वेळी घेतला. 

ते म्हणाले, ‘‘काहीही झाले तरी शिवसेनेबरोबर युती होणार आहेच. जागावाटपाचा निर्णय अमित शहा, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. विधानसभेबाबतचे  सर्व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पक्षाने मुख्यमंत्र्यांना दिले आहे, त्यामुळे तेच सर्व निर्णय घेतील.’’

ईव्हीएमच्या वापराबाबत विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत पाटील म्हणाले, ‘‘निवडणुका कशा पद्धतीने घ्यायच्या, याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, त्या आदेशाला भाजप बांधील असेल. विरोधी पक्षांनी यापूर्वी न्यायालयातही याचिका दाखल केली होती; परंतु त्यात त्यांना यश आलेले नाही.’’ पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश भोईटे याप्रसंगी उपस्थित होते.

पवार यांनी तयारी ठेवावी...  
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सत्तेत असताना त्यांनी छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांना ‘ईडी’ची (सक्त वसुली संचालनालय) भीती दाखवून पक्षांतर करण्यास भाग पाडले होते का, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर पवार यांनी आणखी काही धक्के सहन करण्याची मानसिक तयारी ठेवावी, असा इशाराही दिला. ‘ईडी’ची भीती दाखवून भाजप इतर पक्षांतील नेत्यांना आपल्याकडे खेचत आहे, असा आरोप झाला, त्याचे खंडन करताना पाटील यांनी पक्षांतराचे दाखले दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How will miss the opportunity for CM says chandrakant patil