पाणी उडाले आकाशी! (व्हिडिओ)

तानाजी झगडे
रविवार, 10 जून 2018

रानमळा येथे नाझरे धरणातील पाण्यात चक्रीवादळ

जेजुरी (पुणे) चक्रीवादळामुळे नाझरे (ता. पुरंदर) धरणातील पाणी शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात खेचले गेले. आकाशात झेपावणाऱ्या रॉकेटप्रमाणे ते भासत होते. रानमळा व परिसरातील ग्रामस्थ, तसेच धरणावरील पर्यटकांनी पाण्याचे हे वादळ मोबाईलमध्ये टिपले. आज दिवसभर तो व्हिडिओ सर्वत्र फिरत होता आणि त्याची सर्वत्र चर्चा होती.

नाझरे धरणाचे पाणी रानमळ्यापर्यंत पसरले आहे. शुक्रवारी सायंकाळी हलकासा पाऊस सुरू झाला. त्याचवेळी अचानक आवाज घोंघावत असल्याचे परिसरातील ग्रामस्थांना ऐकू आले. रानमळा येथील खुशाल कुदळे व इतरांनी घराबाहेर येऊन पाहिले, तर त्यांना धरणाच्या पाण्यावर चक्रीवादळ घोंघावत असून पाण्याचे कारंजे उडाल्यासारखा भोवरा दिसत होता. पाणीही सरळ रेषेत वर जात होते. हे वादळ एवढे तीव्र होते, की धरणातील पाणी जलवाहिनीप्रमाणे ढगापर्यंत गेल्याचे दिसत होते. दूरपर्यंत पांढरी रेषा दिसत होती आणि आवाजही तेवढाच येत होता. या वादळानंतर परिसरात रात्री आठपर्यंत मुसळधार पाऊस झाला. हवेची पोकळी आणि कमी-अधिक दाबामुळे धरणातील पाणी उचलून वर खेचले गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रानमळा परिसरातील ग्रामस्थ व धरणावर कुलधर्म- कुलाचारासाठी आलेले भाविक हे दृश्‍य पाहून अचंबित झाले. हे वादळ एवढे भयानक होते, की पाण्याजवळील मोटारींच्या पेट्या उंच व दूरवर जाऊन पडल्या. जगताप वस्ती परिसरातील काहींच्या घरांवरील पत्रे उडाले. हे वादळ धरणाच्या पाण्यावर असल्याने मोठी हानी झाली नाही. ते लोकवस्तीत शिरले असते तर मोठी हानी झाली असती.

उन्हाळ्यातील चक्रीवादळे अनेकांनी पाहिली. त्यात पालापाचोळा आकाशात दूरवर जातो. मात्र, वादळात पाणी उचलून वर फेकले जाते, हे दृश्‍य नवीन होते. प्रथमच असे दृश्‍य पाहिल्याचे खुशाल कुदळे यांनी सांगितले.

Web Title: hurricane in water in Nazra dam jejuri