हुतात्मा बाबू गेनू यांचे स्मारक मुंबईत राज्य सरकारने करावे; प्रा. वसंतराव भालेराव यांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pranjyto Swagat

हुतात्मा बाबू गेनू बलिदान दिनानिमित्त मुंबईहून पायी आलेल्या प्राण ज्योतीचे स्वागत प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रा. भालेराव बोलत होते.

Manchar News : हुतात्मा बाबू गेनू यांचे स्मारक मुंबईत राज्य सरकारने करावे; प्रा. वसंतराव भालेराव यांचा इशारा

मंचर - 'देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मुंबई येथे काळबादेवी रस्त्यावर इंग्रजांचा परदेशी कपड्याचा ट्रक अडवून आंदोलन करत असताना बलिदान केलेले आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावाचे सुपुत्र हुतात्मा बाबू गेनू यांचे येत्या वर्षभरात मुंबईमध्ये स्मारक झाले पाहिजे. स्मारकासाठी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा. राज्य सरकारकडून स्मारक न झाल्यास आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यातील पाच हजार लोक मुंबईमध्ये आंदोलन करतील.' असा इशारा देशभक्त हुतात्मा बाबू गेनू यांच्या जीवनावर आधारित 'सांडला कलश रक्ताचा' पुस्तकाचे लेखक प्रा. वसंतराव भालेराव यांनी दिला.

मंचर (ता. आंबेगाव) येथे सोमवारी (ता. १२) हुतात्मा बाबू गेनू बलिदान दिनानिमित्त मुंबईहून पायी आलेल्या प्राण ज्योतीचे स्वागत प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रा. भालेराव बोलत होते. पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात, बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या अरुणा थोरात, कामगार नेते अँड. बाळासाहेब बाणखेले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक राजाराम बाणखेले, लाला बँकेचे संचालक मंगेश बाणखेले, जे. के. थोरात, अरविंद वळसे पाटील, डॉ. दत्ता चासकर, रामदास बाणखेले आदी मान्यवरांच्या हस्ते प्राणज्योतीचे स्वागत झाले. ‘हुतात्मा बाबू गेनू अमर रहे’, ‘मुंबईत स्मारक झालेच पाहिजे’ आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.

भोरवाडी येथे काळभैरवनाथ पतसंस्थेचे सभासद व आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्यावतीने प्राणज्योतीचे स्वागत करण्यात आले. अग्रभागी डॉ. दत्ता चासकर, बाळासाहेब खानदेशे होते. पाटीलवाडा येथे मालती थोरात, मीरा बाणखेले, वंदना बाणखेले यांनी व नगरपंचायतीसमोर शरद बँकेचे संचालक दत्ता थोरात, बाजीराव मोरडे, ज्ञानेश्वर शेटे, अरुणा टेके यांनी स्वागत केले.

प्रा. भालेराव म्हणाले, '७२ वर्षापूर्वी स्वातंत्र्याचा अग्नीकुंड प्रज्वलित करण्याचे काम जीवाची पर्वा न करता देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद यांनी केले. त्यांचे स्मारक होण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी हजारो युवकांची आहे. याची नोंद राज्य सरकारने घ्यावी.'

हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे आंबेगाव तालुका अध्यक्ष बाबाजी चासकर म्हणाले, 'देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याचे रणसिंग फुंकले. त्यांचे स्मारक होण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीनी ग्रामसभा घेऊन ठरावाच्या प्रती महाळुंगे पडवळ ग्रामपंचायतीकडे जमा कराव्यात. या मागणीचा पाठपुरावा हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान मार्फत केला जाईल.'

कामगार नेते अँड. बाळासाहेब बाणखेले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक राजाराम बाणखेले, वि. श. महामुनी यांची मनोगते झाली. बाबाजी चासकर यांनी आभार मानले.