'पुणेरी पाटी'ने सुरु केलं ऑनलाइन युद्ध, विषय हैदराबादी बिर्याणीचा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

'पुणेरी पाटी'वर अनेक भन्नाट अशा सुचना लिहिलेल्या असतात. त्या सुचना पाळण्यासाठी असतात की वाचण्यासाठी असाही प्रश्न पडावा. पण सध्या अशाच एका भल्या मोठ्या डिजिटल पुणेरी पाटीने सोशल मीडियावर ऑनलाइन युद्धच सुरु झालं.

पुणे - 'पुणेरी पाटी'वर अनेक भन्नाट अशा सुचना लिहिलेल्या असतात. त्या सुचना पाळण्यासाठी असतात की वाचण्यासाठी असाही प्रश्न पडावा. पण सध्या अशाच एका भल्या मोठ्या डिजिटल पुणेरी पाटीने सोशल मीडियावर ऑनलाइन युद्धच सुरु झालं. या युद्धाचा विषय आहे हैदराबादी बिर्याणी. बिर्याणी प्रेमींसाठी इतर शहरांचे नाव जोडून तयार करण्यात येणारी बिर्याणी ही बिर्याणी असूच शकत नाही. अशा कट्टर बिर्याणी प्रेमींनी या बोर्डाला शेअर करत हैदराबादी बिर्याणी आणि इतर बिर्याणीमधील फरक सांगितला आहे. अर्थात प्रत्येक शहराची खाद्यसंस्कृती असते. त्या खाद्यसंस्कृतीत एखादा पदार्थ विशेष असतो. तो चवीने खाल्ला जातो पण त्यावरून हे असं सोशल मीडियावरही तिखट अशी चर्चा आता रंगली आहे. 

पुण्यातील एका रेस्टॉरंटमधील बोर्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर बिर्याणी पॉलिसी असं टायटल लिहून त्याखाली बिर्याणी कशी असते आणि बिर्याणी म्हणून खपवला जाणारा पुलाव याबद्दल सांगितलं आहे. बोर्डवर म्हटलं आहे की, हैदराबादी बिर्याणी सोडून इतर सर्व प्रकारच्या बिर्याणी या पुलाव समजल्या जातील. 

बॉम्बे आणि पाकिस्तानी बिर्याणीमध्ये मटण मसाल्याचा वापर केला जातो. त्यामुळे ती बिर्याणी नाही तर मटण मसाला राइस असते असंही या बोर्डवर म्हटलं आहे.

भातात बटाटा घातलेल्या पदार्थाला जर बिर्याणी म्हणत असाल तर ते अनधिकृत आहे. ज्या भातात बटाटा घातलेला असतो तो बटाटा वडा राइस असतो असं या बोर्डवर लिहिण्यात आलं आहे. 

बिर्याणीवरून युद्ध सुरु असताना काहींनी बिर्याणीशी संबंधित कहाण्यासुद्दा सांगितल्या आहेत. यात एक ऐतिहासिक कथा सांगण्यात आली आहे. बिर्याणीचं क्रेडीट बादशहा शहाजानची पत्नी मुमताज महलला दिलं गेलं आहे. सांगितलं जातं की, मुमताज तिच्या सेनेच्या बराकीमध्ये गेली तेव्हा अनेक मुघल सैनिक प्रकृतीने खचले असल्याचं दिसलं. तेव्हा सैनिकांची ती अवस्था पाहून तिने शाही आचाऱ्याला बोलावलं आणि सैनिकांसाठी पौष्टीक अशा आहाराची सोय कऱण्यास सांगितलं. यासाठी मुमताजने तांदुळ आणि मटण एकत्र करण्यास सांगितलं ज्यातून सैनिकांचे पोटही भरेल आणि प्रकृती सुधारण्यासाठी पोषक तत्वे मिळतील. त्यानंतर अनेक प्रकारचे मसाले आणि केशर मिसळून बिर्याणी तयार झाली. बिर्याणीबाबत आणखी एक दंतकथा सांगितली जाते. त्यानुसार तुर्क मुघल तैमूरने बिर्याणी भारतात आणली. जी भारतातील लोकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर भारतातील प्रत्येक प्रदेशाने त्यांच्या पद्धतीनुसार बिर्याणी  तयार केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hyderabadi biryani puneri pati online war