सीओईपीमध्ये गुरुवारपासून ‘आयसीएएमई’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

College of Engineering

सीओईपीमध्ये गुरुवारपासून ‘आयसीएएमई’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे - अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) यंत्र अभियांत्रिकी विभागातर्फे येत्या गुरुवार (ता. २३) ते शनिवार (ता. २५) दरम्यान ‘आयसीएएमई-२०२२’ ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेचे उद्‌घाटन प्राज इंडस्ट्रीज्‌चे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी सव्वा नऊ वाजता संस्थेच्या मुख्य सभागृहात होणार आहे. यावेळी संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ-ऑर्नामेंट ॲण्ड कॉम्बॅट इंजिनिअरिंग सिस्टिम) महासंचालक डॉ. प्रवीण मेहता हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेनिमित्त औद्योगिक प्रदर्शनही भरविण्यात येणार असून त्याचे उद्‌घाटन ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष आणि सीओईपीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते दुपारी दोन वाजता होणार आहे. यावेळी डीआरडीओच्या ऑर्नामेंट रिसर्च ॲण्ड डेव्ल्पमेंट एस्टॅब्लिशमेंटचे संचालक डॉ. व्ही. वेंकटेश्वरा राव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परिषदेचे निमंत्रक डॉ. एम. आर. नांदगावकर आणि आयोजक सचिव डॉ. एस.एस. मोहिते यांनी दिली.

परिषदेत प्लाक्षा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रुद्र प्रताप, कमिन्स टेक्नॉलॉजीच्या प्रा. अनुराधा गणेश यांच्यासह आनंद आद्या, पॅथलॉक न्यू जर्सी कंपनीचे संस्थापक व आकेन विद्यापीठ जर्मनीचे प्रा. संदीप पाटील यांची व्याख्याने होणार आहेत. ‘भविष्यातील अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी आणि आव्हाने’ विषयावर परिषदेत चर्चासत्र आयोजित केले आहे. चर्चासत्रात संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, टाटा मोटर्सचे मिलिंद पेशवे, आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. या परिषदेसाठी देश-विदेशातून सुमारे ३०० शोधनिबंध आले आहेत. परिषदेत देश-विदेशातील तज्ञ, प्राध्यापक, वरिष्ठ संशोधक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती डॉ. नांदगावकर यांनी दिली.

सीओईपीच्या ‘आयसीएएमई’ परिषदेचे वैशिष्ट्ये

  • देश-विदेशातून ३०० शोधनिबंध

  • जगभरातील नामांकित तज्ञ, प्राध्यापक होणार सहभागी

  • प्रदर्शनात डीआरडीओतर्फे पिनाक रॉकेट ठेवण्यात येणार

  • बॉम्ब निकामी करणारे अत्याधुनिक रोबो पाहायला मिळणार

टॅग्स :puneE-Conference