‘सीओईपी’ची कार्यपद्धती आदर्श - सामंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

विद्यार्थ्यांनी वेधले स्कायवॉककडे लक्ष
सीओईपीचे वसतिगृह, आणि महाविद्यालय यादरम्यान प्रचंड वाहतूक आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग ओलांडून रोज दोन हजार विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याकडे विद्यार्थिनीने उदय सामंत यांचे लक्ष वेधत आमच्या सुरक्षेसाठी वसतिगृह ते महाविद्यालय, असा स्कायवॉक बांधणार का, असा प्रश्‍न विचारला. त्यावर सामंत म्हणाले, ‘‘वसतिगृह ते महाविद्यालय यादरम्यान स्कायवॉकच्या कामाची निविदा प्रक्रिया पार पडली असून, लवकरच वर्क ऑर्डर देण्यात यावी, यासाठी आयुक्तांशी चर्चा करेन. तसेच, ‘सीओईपी’ला अभिमत विद्यापीठचा दर्जा मिळावा, यासाठी समिती नेमली आहे. तिची शिफारस मान्य केली जाईल.’

पुणे - ‘सीओईपी’ने अभ्यासक्रमाला प्रात्यक्षिकांची जोड देऊन गेल्या १५ वर्षांत अनेक ज्ञानवंत घडविले आहेत. येथील पदाधिकाऱ्यांच्या आदर्श कार्यपद्धतीमुळे या संस्थेचा उत्कर्ष झाला. सीओईपीला देशातीलच नव्हे, तर जगातील एक नंबरची संस्था म्हणून पुढे आणण्यासाठी सरकारकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल, अशी ग्वाही उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उच्च व तंत्रशिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच सामंत यांनी ‘सीओईपी’तील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक डॉ. आहुजा या वेळी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, ‘‘एकीकडे इंजिनिअरिंगला विद्यार्थी कमी होत असताना ‘सीओईपी’तील चित्र आशादायी आहे. अनेकांना डॉक्‍टरेट मिळाली, अनेक जण परदेशात गेले. संस्थेचे पदाधिकारी प्रामाणिकपणे कष्टाने, स्वतः वेळ देऊन या संस्थेला पुढे घेऊन जात असताना शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. शासनाने चिखली येथे ‘सीओईपी’ला दिलेल्या जागेत बांधकाम करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५० कोटी देणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे.

राज्यकर्ते म्हणून आम्ही रस्ते, पूल बांधू; पण चांगले काम करण्यासाठीची मानसिकाता घडविण्याचे काम शैक्षणिक संस्थेतूनच होते. त्याला कठोर परिश्रमाची जोड असल्यास चांगले बदल घडून येतात. हे सीओईपीने दाखवून दिले आहे. लोकांना त्यांची कामे मार्गी लागण्यापेक्षा मंत्र्यांनी त्यांचे ऐकून घ्यावे, अशी अपेक्षा असते. त्यामुळे अनेक प्रश्‍न, आंदोलने संवादातून सुटतात.’’

फिरोदिया ग्रुपकडून मदत
उद्योगपती प्रसन्न फिरोदिया, अध्यक्ष अलुकास्ट यांच्या पुढाकाराने सीओईपीला सुमारे दीड कोटी रुपयांचे आधुनिक ॲल्युमिनियम डायकास्टिंगसाठी ‘ब्युलर’ स्वित्झर्लंड या कंपनीचे मशिन दिले आहे. त्याचबरोबर मेटलजी विभागाच्या आधुनिकीकरणासाठी फोर्स मोटर आणि फिरोदिया ग्रुप यांच्यातर्फे चार कोटी रुपयांची मदत केली आहे. फडणवीस सरकारने सीओईपीला ३० एकर जागा चिखली येथे दिली आहे. तेथील प्रकल्प उभारणीसाठी १५० कोटी रुपये देण्याचेही मान्य केले होते. त्यातील ५० कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे, असे प्रास्ताविकात प्रतापराव पवार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ideal for COEP work process Uday Samant