Money Laundering : पुण्यात बेकायदा सावकारांची दहशत!

कर्जदारांकडून भरमसाट दराने व्याज आकारणी... मुद्दल, व्याज आणि त्यावर दंडव्याजाची रक्कम वसूल करायची...
Money Laundering
Money Launderingsakal
Summary

कर्जदारांकडून भरमसाट दराने व्याज आकारणी... मुद्दल, व्याज आणि त्यावर दंडव्याजाची रक्कम वसूल करायची...

पुणे - कर्जदारांकडून भरमसाट दराने व्याज आकारणी... मुद्दल, व्याज आणि त्यावर दंडव्याजाची रक्कम वसूल करायची... त्यानंतर पुन्हा जादा पैशांची मागणी... पैसे न दिल्यास मारहाण, अपहरण... जिवे मारण्याची धमकी असा बेकायदा सावकारीचा आणि खंडणीचा धंदा शहरात जोरात फोफावला आहे.

एखादी व्यक्ती आर्थिक अडचणींमुळे कर्ज घेण्यासाठी बॅंकेत जाते; परंतु तेथे अर्जासोबत कागदपत्रे, तारण, त्याच बॅंकेतील सभासद असलेली व्यक्तीच जामीनदार हवी, यासह विविध अटींची पूर्तता करावी लागते. त्याची पूर्तता न केल्यास बॅंक कर्ज देत नाही. त्यामुळे ती व्यक्ती पतसंस्थेकडे जाते. परंतु पत नसल्यामुळे तेथेही कर्ज मिळत नाही. काही पतसंस्था कर्जदारांकडून सह्या केलेले कोरे धनादेश घेतात. त्यावर तारीख, रक्कम याचा उल्लेख नसतो.

पतसंस्थेतही निभाव न लागल्यास व्यक्तीला शेवटी नाइलाजास्तव सावकाराकडे जावे लागते. त्यात पुन्हा बेकायदा सावकारी. हे सावकार कर्जदारांकडून मुद्दल, व्याज, दंडव्याज आकारतात. बऱ्याचदा मुद्दलाच्या रकमेपेक्षा व्याजाची रक्कम जास्त असते. मुद्दल परत करूनही जादा पैशांसाठी बेकायदा सावकारांकडून कर्जदारांना घरी जाऊन शिवीगाळ, मारहाणीचे प्रकार सुरू आहेत. जामीनदारांनाही मानसिक त्रास दिला जात आहे. परंतु अनेकजण भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार देत नाहीत. कर्जदारांची पिळवणूक करणाऱ्या सावकारांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बेकायदा सावकाराकडून अपहरण

दांगट पाटीलनगर, शिवणे येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीने बेकायदा सावकाराकडून कर्ज घेतले. या कर्जदाराने मुद्दल, व्याज आणि दंड व्याजाची रक्कम परत केली. तरीही सावकाराने जादा पैशांची मागणी करून फिर्यादीचे अपहरण केले. पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत पैसे उकळले, तसेच फिर्यादीच्या भागीदाराची मोटारही जबरदस्तीने घेऊन गेले. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुरुवारी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सात लाखांपोटी दिले १३,८१,000 रुपये

कोथरूडमधील एका व्यक्तीने बेकायदा सावकाराकडून सात लाख रुपये दरमहा दहा टक्के व्याजाने घेतले. या रकमेपोटी त्यांनी मुद्दल, व्याज आणि दंडव्याज

मिळून १३ लाख ८१ हजार रुपये सावकाराला परत केले. तरीही कर्जदाराकडे त्याच्या तीन खोल्यांचा ताबा आणि आणखी दोन लाख रुपयांची मागणी करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी तिघांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

येरवड्यातील सावकाराला अटक

येरवडा येथील बेकायदा सावकारी करणाऱ्याकडून एकाने ७५ हजार रुपये दरमहा दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात संबंधित व्यक्तीने सावकाराला ऑनलाइन आणि रोख स्वरूपात एक लाख ८६ हजार रुपये परत केले. तरीही तो सावकार फिर्यादीकडे आणखी ७५ हजार रुपयांची मागणी करीत होता. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी विशाल किसन धोत्रे (वय ४१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ ने या बेकायदा सावकाराला अटक केली.

नागरिकांनी बेकायदा सावकारांविरुद्ध निर्भीडपणे पोलिसांकडे फिर्याद द्यावी. परंतु काहीजण भीतीपोटी तक्रार देत नाहीत. अशा वेळी कर्जदाराने निनावी अर्ज दिला तरी पोलिस त्या सावकाराची चौकशी करतील. त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर करून शहरातील बेकायदा सावकारीचे समूळ उच्चाटन केले जाईल.

- सुनील पवार, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा-१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com