esakal | पुणे- पेठांमधील एका वॉर्डमध्ये किती पाऊस पडतो, त्याचे अचूक मोजमाप करणे आता शक्‍य
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे- पेठांमधील एका वॉर्डमध्ये किती पाऊस पडतो, त्याचे अचूक मोजमाप करणे आता शक्‍य

पावसाचे अधिक अचूक मोजमाप करता यावे,यासाठी "आयएमडी'ने सध्याच्या मॉडेलमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.9बाय 9ऐवजी 3बाय 3 किलोमीटर परिसरात पडणाऱ्या पावसाचे अचूक मोजमाप करणारी यंत्रणा विकसित केली आहे.

पुणे- पेठांमधील एका वॉर्डमध्ये किती पाऊस पडतो, त्याचे अचूक मोजमाप करणे आता शक्‍य

sakal_logo
By
उमेश शेळके

पुणे - पुणे शहरातील पेठांमधील एका वॉर्डमध्ये किती पाऊस पडतो, त्याचे अचूक मोजमाप करणे आता शक्‍य होणार आहे. पूर्वी 81 चौरस किलोमीटर भागातील पावसाचे मोजमाप केले जात होते. त्याच्या 9 पटींनी कमी क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे आता दर पंधरा मिनिटांनी मोजमाप घेणे शक्‍य होणार आहे. परिणामी, या मोजमापावरून धरणातील पाण्याची पातळी किती वाढणार आहे, याची अचूक माहिती सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडणे, पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे, संभाव्य पूरबाधित क्षेत्रात पूर्वसूचना देणे पाटबंधारे खात्याला शक्‍य होणार आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून (आयएमडी) दरवर्षी पावसाचा अंदाज दिला जातो, तसेच पावसाळ्यातदेखील पावसाची नोंद घेतली जाते. परंतु, आजपर्यंत 9 बाय 9 किलोमीटरच्या म्हणजे 81 चौरस किलोमीटर परिसरात पडलेल्या पावसाची नोंद घेऊन त्या आधारे किती पाऊस झाला, याचे अनुमान लावले जात होते. परंतु, त्यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे धरणातील पाण्याचे नियोजन करताना पाटबंधारे खात्याला अडचणी येत होत्या. पावसाचे अधिक अचूक मोजमाप करता यावे, यासाठी "आयएमडी'ने सध्याच्या मॉडेलमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 9 बाय 9 ऐवजी 3 बाय 3 किलोमीटर परिसरात पडणाऱ्या पावसाचे अचूक मोजमाप करणारी यंत्रणा विकसित केली आहे. त्यावरून कोणत्या भागात किती मिलिमीटर पाऊस झाला आहे, त्यातून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात किती पाणी येऊ शकते, याचे अनुमान काढणे शक्‍य होणार आहे. याचबरोबर हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा यांचे मोजमापही करणे शक्‍य होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

"आयएमडी'ने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर पाटबंधारे खात्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी "रिअल टाइम डेटा ऍक्विजिशन सिस्टिम' आणि "रिअल टाइम डिझाइन सपोर्ट सिस्टिम' यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये आवश्‍यक ते बदल करण्याचे काम सुरू आहे. 

नव्या मॉडेलचे फायदे 
- नऊ चौरस किलोमीटर क्षेत्रात पडणाऱ्या पावसाची नोंद शक्‍य 
- पावसाचा अचूक आणि विश्‍वासार्ह अंदाज 
- किती मिलिमीटर पाऊस पडला, याचीही माहिती मिळणार 
- पावसाळ्यात धरणातील पाण्याचे अचूक नियोजन करता येणार 
- धरणातील पाणीसाठ्याचे वर्षभराचे व्यवस्थापन करणे सोपे होणार 

राष्ट्रीय जलविज्ञान मिशनअंतर्गत अचूक आणि विश्‍वासार्ह पावसाचे अंदाज व इतर हवामानातील घटकांची माहिती देणारी "रिअल टाइम डेटा ऍक्विजिशन' तसेच ऍनालिसिस करणारी यंत्रणा "आयएमडी'कडून विकसित करण्यात आली आहे. पाटबंधारे खात्याकडे सध्या उपलब्ध प्रणालीमध्ये आवश्‍यक ते बदल करून ही यंत्रणा येत्या वर्षभरात कार्यान्वित करण्यात येणार आहे. 
- संजय हेगाण्णा, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे खाते 

loading image