esakal | पुण्यात अद्यापही सरासरीपेक्षा कमीच पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात अद्यापही सरासरीपेक्षा कमीच पाऊस

पुण्यात अद्यापही सरासरीपेक्षा कमीच पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात गेल्या आठवड्यापासून हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत असल्या तरीही अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. पुणे जिल्ह्यात मात्र सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस नोंदल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

शहरात शिवाजीनगर वेधशाळेत 1 जून ते 13 सप्टेंबरपर्यंत सरासरी 474.5 मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी आतापर्यंत 454.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत 20.1 मिलिमीटर पाऊस कमी पडला आहे. गेल्या महिन्यामध्ये पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पावसाची तूट वाढली. सरासरीपेक्षा 50 मिलिमीटरपर्यंत कमी पाऊस पडल्याचे चित्र गेल्या महिन्याच्या शेवटी दिसत होते. पुण्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुन्हा जोर धरला आहे. अधुन-मधून पावसाच्या सरी पडत असल्याने ही तूट आता भरून निघत असल्याचे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदविले.

पुणे जिल्ह्यात 1 जून ते 13 सप्टेंबर दरम्यान सरासरी 762.4 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा या दरम्यान 821.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत आठ टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

दिवसभर पावसाळी हवा

शहरात सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत 3.2 मिलिमीटर पावसाची नोंद शिवाजीनगर येथील वेधशाळेत झाली. सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांमध्ये 4.8 मिलिमीटर पाऊस पडला. दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. त्यामुळे पावसाळी वातावरणाचा अनुभव पुणेकरांनी घेतला.

हवामान अंदाज

शहरात येत्या मंगळवारी (ता. 14) आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील. परिसरातील घाटमाथ्यावर मात्र तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. बुधवारनंतर (ता. 15) पावसाचा जोर कमी होईल.

पुण्यातील पाऊस

पुणे - 454.4 मिलिमीटर

लोहगाव - 518 मिलिमीटर

पाषाण - 493.9 मिलिमीटर

loading image
go to top