
विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Video : राज्यात पावसाची बॅटिंग सुरूच राहणार; हवामान खात्यानं दिलाय इशारा
पुणे : मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात सोमवारी (ता.१७) जोरदार पाऊस झाला. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यात पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागांमध्ये १८ ते २१ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील चार दिवस मुंबईमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार आहे. मात्र, त्यानंतर जोरदार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेतील हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली.
- जेईई, नीटचं ठरलं; आता राज्यातील 'सीईटी' परीक्षेचं काय होणार?
राज्यातील पावसाचा आढावा
मध्य महाराष्ट्र : घाट भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून दररोज २०.४ सेंटीमीटरहून अधिक पावसाची नोंद होत आहे. दरम्यान मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत घाट भागातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज तसेच नागरिकांसाठी सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात १८ आणि २१ ऑगस्ट रोजी पुणे आणि सातारा येथे जोरदार पाऊस तर १९ आणि २० ऑगस्ट पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तर कोल्हापुरातही बुधवारपासून जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाडा : यंदा मराठवाड्यात चांगला पाऊस पडला असून पुढील दोन दिवस मात्र हलक्या सरी पडतील. त्यानंतर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा.
विदर्भ : अकोला, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सर्वात कमी पावसाची नोंद झाली. तर पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस. तसेच २० ऑगस्टला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
- खडकवासल्यापाठोपाठ पानशेतही आलंय भरत; मुठा नदीकाठच्यांनो दक्ष राहा!
शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस
शहर आणि परिसरात रविवारी सकाळपासूनच हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. पुढील पाच दिवस शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात १९ ऑगस्ट दरम्यान आणखीन एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २० ऑगस्टपासून राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय होईल आणि याचा परिणाम पुणे जिल्ह्यावर होणार आहे. रविवारी पुण्यात १ मिलिमीटर तर लोहगाव येथे ०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)