
नाश्ता देतो सांगून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
पुणे : नाश्ता देण्याच्या बहाण्याने सराईत गुन्हेगाराने एका अल्पवयीन मुलाला दुचाकीवर बसून स्मशानभूमी परिसरात नेले. त्यानंतर तिथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळी सेव्हन लव्हज् चौक ब्रीज ते पुनावाला गार्डन येथील स्मशान भुमीजवळ असलेल्या शेडमध्ये प्रकार घडला.(Immoral abuse of a minor in a cemetery in pune)
अत्याचार करताना मुलाने विरोध केल्याने आरोपीने त्याचा गळा दाबून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सराईत रवींद्र ऊर्फ बल्ली कांबळे (वय ३२, रा. डायसप्लॉट गुलटेकडी) याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.
संबंधित १५ वर्षीय मुलाने याबाबत फिर्याद दिली आहे. अत्याचार झालेला मुलगा एका पदपथावर कुटुंबीयांसोबत राहतो. त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या कांबळे बरोबर मुलाची ओळख झाली होती. त्याच ओळखीचा गैरफायदा मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कांबळेने मुलाला नाश्ता खायला देण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून स्मशानभूमी परिसरात नेले. त्या ठिकाणी त्याने मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. अत्याचारास विरोध केल्याने कांबळेने मुलाचा गळा दाबून केस ओढले. ‘तू जर मी सांगितल्याप्रमाणे केले नाही, तर मी तुझा गळा दाबून मारून स्मशानभूमीत पुरेल,’ अशी धमकी त्याने दिली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपी सराईत गुन्हेगार असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दीपक जमदाडे यांनी दिली.