घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवा - डॉ. अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पुणे जिल्ह्यातील घनकचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होण्याची गरज आहे. यासाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प राबवा,’’ अशी सूचना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी पुणे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांना केली. यानुसार गावागावांत उपलब्ध होणारा कचरा, तेथील लोकसंख्या आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

पुणे - ‘जिल्ह्यातील घनकचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होण्याची गरज आहे. यासाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प राबवा,’’ अशी सूचना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी पुणे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांना केली. यानुसार गावागावांत उपलब्ध होणारा कचरा, तेथील लोकसंख्या आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या आणि त्यावर करायच्या संभाव्य उपाययोजनेसंदर्भात खासदार कोल्हे यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, सामाजिक न्याय सभापती सारिका पानसरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी भारत शेंडगे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या वतीने डॉ. कोल्हे यांना जिल्हा परिषद प्रशासनाची रचना, जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीची माहिती दिली. 

कोल्हे म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात बायोगॅस, परसबाग यासारखे उपाययोजना केल्या जातात. परंतु, सध्या उपलब्ध असलेल्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागात शहरातील मैला शुद्धीकरणासारखे (एसटीपी) प्रकल्प राबविता येतील. शिरूर लोकसभा मतदारसंघातील धरणांचा विचार करता ग्रामीण भागात अधिकाधिक पाणी कसे उपलब्ध होईल, या दृष्टीने उपाययोजना राबवाव्यात. आदिवासी भागात सर्पदंशाच्या घटना घडतात. त्यामुळे तातडीने रुग्णाला रुग्णालयात अथवा आरोग्य केंद्रात पोचविण्यात रुग्णवाहिकेचे विशेष पथक उपलब्ध करून दिले पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि प्राथमिक शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Implement a solid waste management project amol kolhe