
पुणे : राज्य शासनाच्या अधिकार्यांना महत्त्वाची खाती, महापालिकेचे अधिकारी अडगळीत
पुणे : पुणे महापालिकेत दोन महत्त्वाच्या विभागांमध्ये खांदेपालट झाला आहे. मिळकतकर विभागाच्या प्रमुखपदी उपायुक्त अजित देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. तर घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुखपदी आशा राऊत यांची नियुक्ती केल्याचे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरून ज्ञानेश्वर मोळक हे निवृत्त झाल्याने त्यांच्या ठिकाणी सह आयुक्त विलास कानडे यांची नियुक्ती करण्याचा आदेश राज्य शासनाने बुधवारी (ता. ४) काढला. त्यामुळे कानडे यांच्याकडील मिळकतकर विभागाची जागा रिक्त झाली होती.
मिळकतकर विभागाचा कार्यभार पुणे महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यांस दिला जाईल असे अंदाज वर्तविला जात होता. मात्र, आज आयुक्तांनी काढलेल्या आदेशात घनकचरा विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांना मिळकतकर विभागाचे प्रमुख म्हणून बदली करण्याचे आदेश काढले. तर भांडार विभागाच्या प्रमख आशा राऊत यांना घनकचरा व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. त्यामुळे राऊत यांच्याकडे दोन विभागांचा कारभार असणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागात बदल्या होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती, त्यासाठी महापालिकेच्या सेवेतील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी तेथे वर्णी लागावी यासाठी फिल्डींगही लावली होती. मात्र, आयुक्तांनी मिळकतकर आणि घनकचरा या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना याची जबाबदारी दिली आहे.
हापालिकेचे अधिकारी साईडट्रॅकच
पुणे महापालिकेच्या सेवेतील काही अधिकारी गेल्या काही महिन्यांपासून साईडट्रॅक झालेले आहेत. त्यांना मिळकतकर किंवा भांडार विभागाचा कार्यभार मिळेल अशी अपेक्षा होती. दोन आठवड्यापूर्वी राज्य शासनाकडून महापालिकेत दोन उपायुक्त दर्जाचे अधिकारी प्रतिनियुक्तीवर आले, त्यांना जबाबदारी देताना आकाशचिन्ह विभाग, निवडणूक शाखा, सेवक वर्ग विभाग या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आज दोन विभागाचे खातेप्रमुख बदलले पण त्यातही महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. केवळ विलास कानडे यांच्याकडील मागासवर्ग कक्ष या विभागाचा अतिरिक्त कार्यभार परिमंडळ तीनचे उपायुक्त जयंत भोसेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
Web Title: Important Accounts State Government Officials Pune Ajit Deshmukh Head Of Income Tax Department Asha Raut Head Of Solid Waste Management Department
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..