
पुणे - निर्धन रुग्ण निधी (आयपीएफ) शिल्लक नसल्याच्या कारणामुळे रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना लागू कराव्यात.
तसेच, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम इत्यादी व अन्य सर्व आरोग्याशी संबंधित योजना लागू कराव्यात, अशी महत्त्वपूर्ण शिफारस विधी व न्याय विभागाने सोमवारी राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना दिल्या. याबाबतचा शासन निर्णय देखील विभागाने सोमवारी जारी केला आहे.
प्रसूतीदरम्यान महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यास टाळाटाळ केल्याची बाब निदर्शनास आली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय विभागाची चौकशी समिती गठित करण्यात आली होती. समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यामध्ये धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी नियोजित उपचार/शस्त्रक्रिया याकरिता उपलब्ध करून देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे मंत्रालयातील 'धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची' पूर्वमान्यता घ्यावी.
त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीमध्ये या योजनेअंतर्गत धर्मादाय रुग्णालयांनी प्रथम संबंधित रुग्ण तातडीने भरती करून घेऊन त्यावर उपचार करावेत. त्याबाबत ऑनलाइन प्रणालीवर नोंद घेऊन पुढील ४८ तासात प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रालयातील धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये ऑनलाइन प्रणालीमध्ये कार्योत्तर मंजुरीसाठी पाठवावा, असे म्हटले आहे.
काय आहेत धर्मादाय रुग्णालयांना सूचना?
– निर्धन रुग्ण निधी खात्याबाबतची अद्ययावत माहिती धर्मादाय रुग्णालयांकडून घेऊन ती धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत करण्यात यावी.
– धर्मादाय रुग्णालयाने कोणत्याही रुग्णाकडून अवाजवी पद्धतीने अनामत रक्कम स्वीकारू नये.
– यापुढे अनामत रकमेअभावी धर्मादाय रुग्णालयामध्ये कुठल्याही रुग्णास उपचार नाकारले जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.
– कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमधील रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये गर्भवती महिलांवरील उपचाराचाही समावेश करण्यात येत आहे.
– धर्मादाय रुग्णालयाने फार्मसी, रोगनिदान चाचण्या बाहयस्त्रोतांकडे हस्तांतरित केलेल्या असल्या तरी अशा बाहयस्त्रोतांकडे हस्तांतरित सुविधांचे जे एकूण महसूली उत्पन्न दरवर्षी तयार होते त्याच्या दोन टक्के रक्कम आयपीएफ निधीमध्ये वर्ग करण्यात यावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.