काऱ्हाटीच्या श्रीयशवंतरायाच्या उत्सवाबाबत महत्वाची बातमी

जयराम सुपेकर
Sunday, 13 December 2020

काऱ्हाटी (ता.बारामती) येथील ग्रामदैवत श्री यशवंतरायाच्या उत्सवात यंदा पुरण-पोळीचा नैवेद्य आहे. मंगळवारपासून (ता. १५) तीन दिवस येथील यात्रा भरणार होती.

सुपे : काऱ्हाटी (ता.बारामती) येथील ग्रामदैवत श्री यशवंतरायाच्या उत्सवात यंदा पुरण-पोळीचा नैवेद्य आहे. मंगळवारपासून (ता. १५) तीन दिवस येथील यात्रा भरणार होती. कोविड-१९ या कोरोना महामारीच्या साथीमुळे ग्रामस्थांच्या विचाराने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यात्रा समितीच्या सुत्रांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

मार्गशिर्ष प्रतिपदा ते तृतिया असे तीन दिवस येथील उत्सव असतो. जिल्ह्याच्या बाहेरूनही जत्रेसाठी भाविक व विविध दुकाने येथे थाटली जातात. चुलीवरची बाजरीची भाकरी व मटणासाठी येथील उत्सव प्रसिद्ध आहे. परिणामी बाहेरगावाहून येणारे पै-पाहूणे व भाविकांची मोठी गर्दी होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गर्दी टाळण्यासाठी यंदा पशुहत्या न करण्याचा महत्वपूर्ण निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. परिसरात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. गावच्या परिसरात आज आखेर कोरोनाचे ३१ रुग्ण असून पैकी दहा रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा नुकतीच झाली. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी काऱ्हाटी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाची जत्रा रद्द करण्यात आली आहे.

उत्सव कालावधीमध्ये गावात सार्वजनिक व वैयक्तिक पशु हत्तेवर तसेच, गावात मटन, चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सदर बाबींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

उत्सव काळात बाहेरून येणारे भाविक, दुकानदार, छोटेमोठे व्यवसायिक व पाहुण्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यंदा कोरोना विषयक सरकारी सर्व नियमांचे पालन करून केवळ धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. कुस्त्यांचा फड यंदा भरणार नाही. लोकनाट्य होणार नाही. त्यामुळे बाहेर गावाहून येणारे भाविक, पाहूणे मंडळी व विविध व्यावसायिकांनी गावात येऊ नये असे अवाहन करणारे फलक गावच्या प्रमुख चौकात लावण्यात आले आहेत.   

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important news about the festival of Shriyashwantaraya of Karhati